रस्ते, गटारीच्या निविदेत अडीच कोटीचा घोटाळा
By admin | Published: May 10, 2017 11:37 PM2017-05-10T23:37:01+5:302017-05-10T23:37:01+5:30
रस्ते, गटारीच्या निविदेत अडीच कोटीचा घोटाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या रस्ते व गटारीच्या निविदेत दोन कोटी ४४ लाख रुपयांचा घोटाळा झाला आहे. या निविदेत अनेक बनावट कामे घुसडण्यात आली असून, कोट्यवधी रुपयांचा निधी लाटण्याचा नगरसेवक व अधिकाऱ्यांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप जिल्हा सुधार समितीने केला आहे. ही निविदा रद्द करावी व दोषींवर कारवाईसाठी १५ मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सुधार समितीचे कार्याध्यक्ष अॅड. अमित शिंदे, अध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रा. आर. बी. शिंदे यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत रस्ते व गटार घोटाळ्याचा पर्दाफाश केला. ते म्हणाले, महापालिका आयुक्तांच्या सहीने ९ मे रोजी तीनही शहरातील रस्ते व गटारीच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निविदेत पूर्वी झालेल्या कामांचाही समावेश झाला आहे. आमदार निधीतून झालेली कामेही निविदेत आहेत. एकाच रस्त्याची नावे बदलून दोन कामे पकडली आहेत. गटारीची कामे तांत्रिकदृष्ट्या चुकीची आहेत. त्यामुळे महापालिकेचा पैसा वाया जाणार आहे. निविदेत रस्ता सुधारणा असा उल्लेख केला आहे. त्याचा अर्थच समजत नाही. महापालिका हद्दीत दहा दत्तनगर असतील. नेमक्या कुठल्या दत्तनगरमध्ये काम मंजूर आहे, हे निविदेवरून स्पष्ट होत नाही. कुपवाड शहरात तीन जैन मंदिर आहेत. त्यापैकी कोणत्या जैन मंदिरासमोर रस्त्याचे काम होणार आहे? मिरजेतील बहुतांश कामे बनावट आहेत. ख्रिश्चन दफनभूमीला वॉल कंपाऊंड व पेव्हिंग बसविण्यासाठी निविदा काढली आहे. वास्तविक दफनभूमीचे कंपाऊंड सुस्थितीत आहे. गटारीची कामे तर चुकीच्या पद्धतीने सुरू आहेत. रामामातानगर येथे गटारीचे काम सुरू असतानाही निविदा काढली आहे. राजमाने हौसिंग सोसायटीतील रस्ते आमदार फंडातून झाली आहेत. तिथे तसा फलकही आहे. तरीही तेथील कामाची निविदा प्रसिद्ध केली आहे. मंगलमूर्ती कॉलनीतील रस्त्याचे कामही पूर्ण झाले आहे. अभिनंदन कॉलनीतील रस्ते सहा महिन्यांपूर्वी करण्यात आले आहेत. शिवमंदिर इसापुरे गल्लीत पेव्हिंग ब्लॉक असताना पुन्हा रस्ता दुरुस्तीकरणावर पैसे खर्च केले जात आहेत.
या निविदेत अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी जवळपास २ कोटी ४४ लाख रुपयांचा घोटाळा करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे ही निविदा रद्द करून दोषींवर कारवाई करावी, अशअ’ी मागणीही त्यांनी केली.