सांगलीत २१ लाख लिटरने पाणी उपसा वाढला
By admin | Published: March 16, 2017 11:37 PM2017-03-16T23:37:32+5:302017-03-16T23:37:32+5:30
महापालिका : सुरळीत पुरवठ्याचे युद्धपातळीवर प्रयत्न
सांगली : सांगली शहराच्या उपनगरांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न चालविले आहेत. गुुरुवारी कृष्णा नदीवरील साडेसातशे एच.पी.चा पंप सुरू करण्यात आला. त्यामुळे शहरात दिवसभरात २१ लाख लिटर पाणी उपसा वाढला आहे. येत्या दोन-तीन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे पाणीपुरवठा अभियंता शरद सागरे यांनी सांगितले.
महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे गेल्या आठ दिवसांपासून पत्रकारनगर, शामरावनगर, हनुमाननगर, त्रिमूर्ती कॉलनी, शंभरफुटी रोडवरील अनेक उपनगरांत पाण्याचा ठणठणाट होता. काही भागात तर दूषित आणि अळ्यामिश्रित पाणीपुरवठा झाला. त्यामुळे नागरिकांतून संतापाची लाट उसळली होती. पाणीटंचाईचे पडसाद स्थायी समिती सभेतही उमटले. नगरसेविका अलका पवार, राजू गवळी, प्रदीप पाटील यांनी स्थायी समितीत आंदोलन केले. महापौर हारूण शिकलगार व आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी दखल घेऊन नियोजनासाठी बैठकही घेतली.
खेबूडकर यांनी पाणीपुरवठ्याचे नियंत्रण करणाऱ्या व्हॉल्व्हचा शोध घेऊन ते दुरूस्तीचे आदेश दिले होते. तसेच कृष्णा नदीवर साडेसातशे एच.पी.चा पंप सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने गुरुवारी पंप सुरू केला. त्यामुळे सांगलीत २१ लाख लिटर जादा पाणी उपसा वाढला आहे. व्हॉल्व्हची शोधमोहीम सुरू असून येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू होईल, असे कार्यकारी अभियंता सागरे यांनी सांगितले.
दरम्यान, पत्रकारनगरात पाणीटंचाईचा प्रश्न निकाली काढण्यासाठी खुदाई करून पाईपलाईनची स्वच्छता करण्यात आली. शिवाय पाईपलाईन कुठे तुंबली आहे का, याचीही तपासणी केली. (प्रतिनिधी)