बेडग येथील स्वागत कमानीसाठी २५ लाख, आंबेडकरी समाजाच्या संघर्षाला यश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 01:50 PM2023-10-27T13:50:46+5:302023-10-27T13:53:01+5:30
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी
सांगली : बेडग (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमानीसाठी २५ लाख २० हजार रुपये निधीची तरतूद झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रकाशित केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कमानीचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत नावीन्यपूर्ण योजनेतून कमानीसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. बेडग ग्रामसभेने ‘गावात कोणतीही स्वागत कमान उभी करायची नाही’ असा ठराव केला आहे, त्यामुळे ही कमान मिरज-आरग रस्त्यावर गावठाणाबाहेर उभी केली जाणार आहे. किलोमीटर क्रमांक ८/७८० या जागेवर ती उभी राहील. अर्थात, स्वामी समर्थ आश्रमशाळेनजीक उभारली जाणार आहे. अंतर्गत रुंदी सुमारे ४५ फूट आहे, त्यामुळे भविष्यात मिरज-आरग मार्गाचे रुंदीकरण झाले, तरी अडथळा येणार नाही.
या ठिकाणी कमान उभारण्यास आंदोलक आंबेडकरी समाजाने सहमती दर्शविली आहे. कमानीचा आराखडा शासकीय नियमानुसार तयार केला जाणार आहे. या ठिकाणी कमानीला बेडग ग्रामस्थांचा विरोध असणार नाही असे जिल्हा प्रशासनाने सांगितले. ही कमान तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
फडणवीस यांची मध्यस्थी
आंबेडकरी समाजाने कमान पाडल्याच्या निषेधार्थ बेडग ते मुंबई पायी लॉंग मार्च काढला होता त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय खर्चातून कमान उभारण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार ही कमान उभी राहत आहे.