संचालक म्हणून निवडून आले, दंगा केल्याने तीस जणांवर गुन्हे दाखल झाले; सांगलीतील प्रकार
By संतोष भिसे | Published: June 24, 2024 06:31 PM2024-06-24T18:31:20+5:302024-06-24T18:32:11+5:30
हमाल पंचायत पतपेढीच्या सात संचालकांसह तीस जणांवर गुन्हे
सांगली : हमाल पंचायत सहकारी पतपेढीच्या निवडणूक निकालानंतर विनापरवाना रॅली काढल्याबद्दल संचालकांसह २५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. संजयनगर पोलिसांनी ही कारवाई केली. संशयितांनी जमावबंदी आदेशाचा भंग केला व घोषणाबाजी केली असा ठपका पोलिसांनी ठेवला आहे.
बाळू रामचंद्र बंडगर (रा. स्टेट बँक कॉलनी, अभयनगर, सांगली), तुकाराम बापू हाक्के (निरंकार कॉलनी, अभयनगर, सांगली), सुरेश प्रकाश कचरे (रा. आनंदनगर, भारत सुतगिरणीजवळ, कुपवाड), रामचंद्र विलास चोरमुले (रा. ढालेवाडी, ता. कवठेमहांकाळ), राजू मनोहर गायकवाड (रा. जुनी धामणी रस्ता, हनुमाननगर), सदाशिव उत्तम खांडेकर (रा. बाज, ता. जत), देवदास सायमन बंदेला (रा. केसरखाने मळ्यासमोर, मालगाव रस्ता, मिरज), महादेव बापू रुपनर (अष्टविनायकनगर, सांगली), सागर वामन लेंगरे (रा. रामजानकी मंदिराजवळ, संजयनगर, सांगली), अजित धोंडीराम कुटे (रा. बजरंगनगर, कुपवाड), संजय शिवाजी टोणे (रा. हमालवाडी, कुपवाड), पंकज भीमगोंडा पाटील (रा. बामनोली रस्ता, कुपवाड), पोपट बाबूराव काळेल (रा. सावळी, ता. मिरज) व अन्य १० ते १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील सातजण नव्याने निवडून आलेले संचालक आहेत.
हमाल पतपेढीची निवडणूक रविवारी (दि. २३) झाली. सायंकाळी मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत बापूसाहेब मगदूम सहकारी पॅनेलने सर्वच जागा जिंकत बाजी मारली. निकालानंतर विद्यमान संचालकांसह कार्यकर्त्यांनी संजयनगर परिसरात दुचाकी रॅली काढली. जोरदार घोषणाबाजी केली. सध्या जिल्हाभरात जिल्हाधिकार्यांनी जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्याचा भंग करून विनापरवाना रॅली काढल्याने पोलिसांनी गुन्हे दाखल केले.