जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:18 AM2021-06-19T04:18:23+5:302021-06-19T04:18:23+5:30
सांगली : मान्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्यामुळे शिराळा, वाळवा, जत तालुक्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात खरीप पेरण्या जोरात झाल्या आहेत. गेल्या ...
सांगली : मान्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्यामुळे शिराळा, वाळवा, जत तालुक्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात खरीप पेरण्या जोरात झाल्या आहेत. गेल्या दोन दिवसात मान्सून पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्यामुळे येत्या आठवड्यात गती येणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २५ टक्के पेरण्या झाला असून, शिराळा तालुक्याचे प्रमाण सर्वाधिक ९५ टक्के आहे.
जिल्ह्यात १५ ते ३० जूनपर्यंत खरिपाच्या पेरण्या होतात. पावसाचा अंदाज घेऊनच शेतकरी पेरणीसाठी गडबड करतो. गेल्या पाच वर्षांत यावर्षी उन्हाळी पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागती करुन जमीन तयार केली आहे. शिराळा तालुक्यात धूळवाफ पेरण्या होत असल्यामुळे सध्या तेथे ९५ टक्क्यांपर्यंत आकडेवारी दिसत आहे. वाळवा तालुक्यात ३०.८ टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये भात, ज्वारी, मका, सोयाबीन, भुईमूग पिकांचा समावेश आहे. जत तालुक्यातही मान्सूनपूर्व पाऊस झाल्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी कडधान्यासह ज्वारी, मूग, बाजरी, मका, सूर्यफुल, उडदांची पेरणी केली आहे. खरिपाची ६४.६ टक्के पेरणी झाली. शिराळा तालुक्यानंतर प्रथमच जत तालुक्याने आघाडी घेतली आहे. पलूस, कडेगाव, खानापूर आणि मिरज तालुक्यात १० टक्क्यांपेक्षा कमी पेरणी झाली आहे. येथील पेरण्यांना येत्या आठवड्यात गती मिळणार आहे.
चौकट
तालुकानिहाय पेरण्यांची टक्केवारी
तालुका टक्के
मिरज ५
जत ६४.५
खानापूर १
वाळवा ३०.८
तासगाव १
शिराळा ९५
आटपाडी १७.७
क.महांकाळ १३.७
पलूस ८.३
कडेगाव २.२
एकूण २५
चौकट
आठ दिवसात ७० टक्क्यांपर्यंत पेरणी
मान्सून पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी होता. चार दिवसांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस सुुरु आहे. यामुळे येत्या आठवड्यात जरा उघडीप मिळताच पेरण्या गती घेणार आहेत. आठ दिवसात ७० टक्क्यांपर्यंत पेरणी होईल, असे मत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली.
चौकट
जादा दराने खते, बियाणे विक्री केल्यास कारवाई
जिल्ह्यात रासायनिक खत, बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. बियाणे, खते खरेदी करताना दुकानदाराकडून शेतकऱ्यांनी पावती घ्यावी. एखाद्या दुकानदारांना निश्चित किमतीपेक्षा जादा दराने विक्री केल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क करावा. बोगस, विनापरवाना खते, बियाणे विक्री केल्यास संबंधित दुकानदारावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही बसवराज मास्तोळी यांनी दिला.