२५ टन ऑक्सिजन आला, लसीचा मात्र पत्ता नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:44 AM2021-05-05T04:44:44+5:302021-05-05T04:44:44+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना ऑक्सिजनसाठी संघर्ष करावा लागत आहे, तर सामान्य नागरिकांना कोरोनापासून बचावासाठी लस मिळण्याकरिता खटाटोप करावा ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना ऑक्सिजनसाठी संघर्ष करावा लागत आहे, तर सामान्य नागरिकांना कोरोनापासून बचावासाठी लस मिळण्याकरिता खटाटोप करावा लागत आहे. मंगळवारी २५ टन ऑक्सिजन मिळाला, लसीचा मात्र एकही डोस मिळाला नाही.
कोरोनाबाधितांची दररोजची संख्या दीड हजारांवर जाऊ लागल्याने सारेच हवालदिल झाले आहेत. बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविर यांच्या कमतरतेमुळे रुग्णालयांची तारांबळ उडाली आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांना दाखल करून घेण्यास रुग्णालये तयार नाहीत, त्यामुळे नातेवाईकांची फरफट सुरू झाली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अशी गंभीर स्थिती निर्माण झाली नव्हती.
ऑक्सिजनची टंचाई दूर करण्यासाठी प्रशासन अखंड पाठपुरावा करत आहे. त्यामुळे दिवसभरात काही टँकर मिळू लागले आहेत. मंगळवारी १५ टन आणि १० टन असा एकूण २५ टन ऑक्सिजन मिळाला. काही ऑक्सिजन बेल्लारीहून तर काही पुण्याहून मिळाला. त्याचे तातडीने वितरण कोविड रुग्णालयांना करण्यात आले. त्यामुळे व्हेंटिलेटरवरील रुग्णांना दिलासा मिळाला. डॉक्टरांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. पण हा साठा २४ तासही पुरणार नाही, त्यामुळे नव्याने पुरवठ्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. अन्न व अैाषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नितीन भांडारकर यांनी सांगितले की, आज २५ टन ऑक्सिजन आला असला तरी आणखी उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, सलग पाचव्या दिवशीदेखील कोरोना लसीचा पुरवठा होऊ शकला नाही. लस मिळेल असा निरोप आल्यानंतर व्हॅन पुण्याला पाठविण्यात आली. मंगळवारी सकाळी दहापासून ती तेथेच थांबून आहे. त्यातून सांगलीसह कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठी लस येणार आहे. बुधवारी सकाळपर्यंत काही डोस मिळतील व त्यानंतर लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे.
चौकट
मंगळवारचे लसीकरण असे :
१८ ते ४५ वर्षे - ९२५
४५ ते ६० वर्षे - १४
६० वर्षांवरील - १२
दिवसभरात एकूण - ११३५
आजवर एकूण लसीकरण - ५,६६,२९३