कारगिलमधील वीर पुत्रांच्या बलिदानाला २५ वर्षे पूर्ण; सांगली जिल्ह्यातील सुरेश चव्हाण, महादेव पाटील यांना वीरगती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 12:49 PM2024-07-26T12:49:00+5:302024-07-26T12:49:24+5:30
सांगली : सांगली जिल्हा म्हणजे क्रांतिकारकांची भूमी. स्वातंत्र्य चळवळीत अनेकांनी प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही सांगली सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला ...
सांगली : सांगली जिल्हा म्हणजे क्रांतिकारकांची भूमी. स्वातंत्र्य चळवळीत अनेकांनी प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही सांगली सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आजवर जिल्ह्यातील १६० सुपुत्र भारतमातेचे रक्षण करताना शहीद झाले. सद्य:स्थितीत जवळपास २० हजार सैनिक सैन्यदलात कार्यरत आहेत, तर तेवढेच माजी सैनिक आहेत. याच जिल्ह्यातील करोली टी (ता. कवठेमहांकाळ) चे जवान सुरेश चव्हाण आणि वडगाव (ता. तासगाव) चे महादेव पाटील हे १९९९ च्या कारगिल युद्धात शहीद झाले. त्यांच्या युद्धातील पराक्रमाला २५ वर्षे झाली. या वीर पुत्रांचे बलिदान आजही स्मरणात राहते.
१९९९ च्या मे महिन्यात पाकिस्तानी सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केली. कारगिल भागावर अतिक्रमण केले. पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावण्यासाठी तब्बल ६० दिवस युद्ध चालले. जवळपास ३० हजार भारतीय सैनिक युद्धात सहभागी झाले होते. पाकिस्तानी लष्करातील वेगवेगळ्या रेजिमेंट यामध्ये सहभागी होत्या. त्यांनी तोफखान्याचा वापर केला. रोज बॉम्बगोळे, गोळीबार असा दोन्ही बाजूंनी वर्षाव सुरू होता. भारताने कडवी झुंज देत निकराचा प्रतिकार केला. यामध्ये ५२७ जवान कामी आले, तर १३६३ जवान शहीद झाले. ऑपरेशन विजय ६० दिवसांनंतर यशस्वी झाले. २६ जुलै १९९९ रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला.
कारगिल युद्धात त्यावेळी जिल्ह्यातील काही सैनिक सहभागी होते. युद्धाचा प्रसंग पाहून सैनिकांच्या कुटुंबातील सदस्य चिंतेत होते. दुर्दैवी बातमी कानावर पडू नये, अशी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक प्रार्थना करत होते. त्याचवेळी करोली टी (ता. कवठेमहांकाळ) चे वीर पुत्र हवालदार सुरेश गणपती चव्हाण हे महार रेजिमेंटमधून पाकिस्तानी सैन्याला मुकाबला करताना शर्थीची झुंज देत होते. त्यांनी व त्यांच्या रेजिमेंटने अतुलनीय शौर्य गाजवत शेकडो पाकड्यांना यमसदनी पाठवले. सुरेश चव्हाण हे तब्बल दोन महिने शत्रूशी लढत होते. दि. ४ जुलै रोजी ते धारातिर्थी पडले. त्यांच्या शहीद होण्याची वार्ता समजताच करोली टी नव्हे तर जिल्हा शोकसागरात बुडाला.
कारगिल युद्ध संपण्याची सर्वांनाच प्रतीक्षा असताना जिल्ह्यात आणखी एक दुर्दैवी बातमी येऊन धडकली. वडगाव (ता. तासगाव) येथील पॅरा रेजिमेंटचे शिपाई महादेव नामदेव पाटील हे कारगिलमध्ये युद्धात पराक्रम गाजवत होते. त्याचवेळी शत्रूच्या हल्ल्यात दि. २४ जुलै १९९९ रोजी वीरगती प्राप्त झाली. त्यामुळे जिल्हा पुन्हा शोकसागरात बुडाला. जिल्ह्यातील या दोन वीर पुत्रांनी युद्धात गाजवलेल्या पराक्रमाला आणि त्यांच्या वीरगतीला दि. २६ जुलै रोजी २५ वर्षे होत आहेत. त्यांच्या पराक्रमाच्या आठवणीही आज स्मरणात आहेत.
शौर्याची परंपरा
स्वातंत्र्यपूर्व काळात जिल्ह्यातील क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले. हीच शौर्याची परंपरा जिल्ह्याने जपली आहे. सैन्यदलात सद्य:स्थितीत २० हजारांहून अधिक जवान कार्यरत आहेत, तर देशसेवा बजावलेले तेवढेच माजी सैनिक जिल्ह्यात आहेत.
आजवर १६० शहीद
भारत-पाक, भारत-चीन युद्धासह वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये जिल्ह्यातील वीर जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवले आहे. आजवर १६० जवान शहीद झाले. ७० जणांना शौर्यपदक मिळाले.