आरोग्य सेवेवर ताण; सांगली ‘सिव्हिल’मधील २५० खाटांची इमारत दुरुस्तीअभावी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 04:26 PM2021-11-30T16:26:09+5:302021-11-30T16:27:02+5:30
वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात आरोग्य सेवेवरील ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात तब्बल २५० खाटा असलेली चारमजली इमारत धोकादायक बनल्याने प्रशासनाने कुलूपबंद केली आहे.
शीतल पाटील
सांगली : जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांच्या वैद्यकीय उपचाराचे माहेरघर असलेल्या येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात आरोग्य सेवेवरील ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात तब्बल २५० खाटा असलेली चारमजली इमारत धोकादायक बनल्याने प्रशासनाने कुलूपबंद केली आहे. शासनाकडे इमारतीच्या दुरुस्तीचा प्रस्तावही पाठविला आहे; पण तो वर्षभरापासून धूळ खात आहे.
सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात जिल्ह्यासह कोल्हापूर, सोलापूर, कर्नाटकातील रुग्ण उपचारासाठी येतात. गोरगरीब, मजूर, कामगार, मध्यमवर्गीयांना या रुग्णालयांचा मोठा आधार आहे. रुग्णालयाच्या परिसरात गेल्या काही वर्षांत अनेक सुविधा निर्माण झाल्या. कोरोनाकाळातही रुग्णांना दिलासा देण्यात रुग्णालयाचा मोठा हातभार होता. दररोज हजार ते दीड हजार रुग्ण औषधोपचारासाठी येत असतात.
सध्या रुग्णालयात ४०० खाटा आहेत. याच रुग्णालयातील चारमजली इमारत धोकादायक बनली आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये इमारतीचा चौथा मजला पूर्णपणे खराब झाल्याचे आढळून आले. चारही मजल्यांसाठी उभारण्यात आलेली स्वच्छतागृहाची इमारतही मोडकळीस आली आहे. या इमारतीत २५० खाटा होत्या. यात स्त्री वैद्यकीय कक्ष असून प्रसूती, कुटुंब नियोजनासह विविध उपचार केले जात होते; पण इमारतच धोकादायक बनल्याने प्रशासनाने ती कुलूपबंद केली. या इमारतीतील २५० खाटा इतर इमारतीत स्थलांतरित केल्या. त्याचा ताण नव्या इमारतींतील सुविधांवर पडला आहे. त्यामुळे या इमारतीची दुरुस्ती करून पुनर्वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे; पण राजकीय इच्छाशक्तीअभावी दुरुस्तीचा प्रस्तावही शासनदरबारी धूळ खात असल्याचे दिसून येते.
पावणेदोन कोटींचा खर्च
सिव्हिलमधील २५० खाटांची सोय असलेली ही इमारत मोडकळीस आली आहे. चौथ्या मजल्यावरील स्लॅब खराब झाला आहे. संलग्न असलेली स्वच्छतागृहाची इमारत पूर्णपणे खराब झाली आहे. ती पाडून नवीन बांधावी लागणार आहे. तळमजला व इतर दोन मजल्यांवर दुरुस्तीचे काम करावे लागणार आहे. त्यासाठी एक कोटी ८० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसा प्रस्तावही रुग्णालय प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे; पण त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. इमारतीतील सर्वात वरचा मजला बंदच ठेवावा लागणार आहे; पण इतर तीन मजले वापरात आल्यास जवळपास १७५ खाटांची सोय होऊ शकते.