सांगली महापालिकेवर २५० कोटींचा बोजा, आणखी ३५० कोटी आणणार कोठून?

By शीतल पाटील | Published: December 4, 2023 04:21 PM2023-12-04T16:21:25+5:302023-12-04T16:21:43+5:30

चांदोली धरणातून पाणी आणण्यात अडथळ्यांची शर्यत

250 crore burden on Sangli Municipal Corporation, Obstacles in fetching water from Chandoli Dam | सांगली महापालिकेवर २५० कोटींचा बोजा, आणखी ३५० कोटी आणणार कोठून?

सांगली महापालिकेवर २५० कोटींचा बोजा, आणखी ३५० कोटी आणणार कोठून?

शीतल पाटील

सांगली : महापालिकेच्या उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ गेल्या २५ वर्षांत कधीच जमलेला नाही. सांगली- मिरज ड्रेनेज, कुपवाड ड्रेनेज, एलईडी प्रकल्प, शेरीनाला एसटीपी यासाठी महापालिकेवर आधीच २५० कोटींचा बोजा आहे. त्यात चांदोली धरणातून पाणी आणण्यासाठी किमान १२०० कोटी लागतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. या प्रकल्पासाठी महापालिका हिश्श्यापोटी ३५० कोटींची तरतूद करावी लागणार आहे. हा निधी आणणार कोठून, असा प्रश्न आहे. त्यामुळे चांदोली धरणातून पाणी आणण्यात महापालिकेला अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागणार आहे.

चांदोली धरणातून पाणी की वारणा नदीतून हा वाद सध्या जोरदार पेटला आहे. वारणा नदीतून पाणी आणण्यासाठी आठ किलोमीटरची पाईपलाईन टाकावी लागणार आहे. याशिवाय १३ पाण्याच्या टाक्या, जुन्या पाईपलाईन बदलण्यासह २५० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानंतर चांदोली धरणातून पाणी आणण्याची मागणी होऊ लागली. त्याचे सादरीकरणही झाले. काही तज्ज्ञांनी या प्रकल्पाचा खर्च ४०० कोटी, ६३३ कोटी इतका होईल, असा अंदाज व्यक्त केला; पण महापालिका प्रशासनाला मात्र १२०० कोटी लागतील, असे वाटते.

सध्या कुपवाड ड्रेनेज योजनेसाठी महापालिकेला ९० कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. याशिवाय मिरज ड्रेेनेजसाठी अतिरिक्त ८ कोटी लागतील. शेरीनाला एसटीपीचा ९३ कोटींचा प्रकल्प मंजूर झाला आहे. त्यात शंभर टक्के अनुदान मिळणार की महापालिकेला ३० टक्के वाटा उचलावा लागणार हे अजून निश्चित नाही. महापालिकेचा हिस्सा जवळपास २७ कोटींच्या घरात जातो. एलईडी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्पही ११३ कोटींच्या वर पोहोचला आहे. एकूण आधीच महापालिकेवर २५० कोटींचा बोजा आहे. महापालिकेचे दरवर्षीचे उत्पन्न २०० कोटींच्या घरात आहे. याशिवाय ठेकेदारांची देणीही २५ कोटी आहेत. इतका आर्थिक बोजा असताना चांदोली धरणातून पाणी प्रकल्पाचा ३५० कोटींचा बोजा महापालिकेला परवडणार नाही, असाच सूर आहे.

मग मिरजेने काय पाप केले?

चांदोली धरणातून सांगली व कुपवाडसाठी पाणी आणण्याचा विचार पुढे आला. त्यासाठी कृष्णा व वारणा नदीच्या प्रदूषणाचे कारण दिले जात आहे. महापालिकेत मिरज शहराचाही समावेश होता. मिरजेला वारणा नदीतून पाणी दिले जाते. वारणा नदी प्रदूषण होत असेल तर मग मिरजकरांना चांदोलीतून पाणी दिले पाहिजे. मिरजकरांनी काय पाप केले आहे? असा प्रश्नही भविष्यात उपस्थित होऊ शकतो.

महापालिकेचे उत्पन्न (आकडे कोटीत)

  • २०१९-२०२० : १२९.०६
  • २०२०-२०२१ : १४४.१
  • २०२१-२०२२ : १६४.७१
  • २०२२-२०२३ : १८०.२५


उत्पन व खर्चाची आकडेवारी

  • विभाग जमा खर्च
  • जलनिस्सारण २.४६, ६.८१
  • पाणीपुरवठा : २२.२८, ३८.५९
  • आरोग्य : ४.२२, ४४.०६
  • विद्युत : ०, १०.२६

Web Title: 250 crore burden on Sangli Municipal Corporation, Obstacles in fetching water from Chandoli Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली