पाडव्याला जिल्ह्यात उडाला २५० कोटींच्या उलाढालीचा बार

By admin | Published: November 2, 2016 12:13 AM2016-11-02T00:13:46+5:302016-11-02T00:13:46+5:30

खरेदीचा उत्साह : इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहने, सोने-चांदी, कपड्यांची मोठी खरेदी; कंपन्यांच्या आॅफर्सचा फायदा

250 crore turnover bar fired in the district | पाडव्याला जिल्ह्यात उडाला २५० कोटींच्या उलाढालीचा बार

पाडव्याला जिल्ह्यात उडाला २५० कोटींच्या उलाढालीचा बार

Next

सांगली : विद्युत रोषणाईने सजलेली दुकाने, वेगवेगळ््या आॅफर्सचे झळकणारे फलक, सेवा-सुविधांची रेलचेल अशा वातावरणात दिवाळी पाडव्याच्या खरेदीचा उत्साह सर्वत्र दिसून आला. सोमवारी दिवसभर खरेदीसाठी सांगलीच्या बाजारपेठा, वाहनांचे शोरुम्स्, मॉल्समध्ये ग्राहकांची गर्दी होती. विविध क्षेत्रात सुमारे अडीचशे कोटींची उलाढाल झाल्याची माहिती विक्रेत्यांकडून मिळाली.
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या दिवाळी-पाडव्याला शहरातील बाजारपेठ फुलून गेली होती. सोने-चांदी, दुचाकी, चारचाकी वाहने, इलेक्ट्रॉनिक व गृहोपयोगी वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली. नवीन फोर के तंत्रज्ञानाच्या एलईडी आणि फोर-जी मोबाईलवर ग्राहकांच्या उड्या पडल्या, तर सोन्याचा दर दहा ग्रॅमला ३० हजार ७०० च्या आसपास असल्याने, सराफ कट्ट्यावरही गर्दी उसळली होती. परिणामी सोन्याची विक्रमी उलाढाल झाली.
दिवाळी-पाडव्याचा मुहूर्त साधून बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी जय्यत तयारी केली होती. वेगवेगळ्या आॅफर्स देण्यात आल्याने खरेदीला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. वेगवेगळ्या आॅफर्समध्ये लॅपटॉप, मोबाईल, टॅब यासह एलईडी टीव्ही, फ्रीजचा समावेश होता. वाहनांच्या खरेदीलाही उत्तम प्रतिसाद मिळाला. मोफत घरपोच सेवाही अनेकांनी उपलब्ध करून दिली होती.
बाजारपेठेत ग्राहकांचा स्मार्ट फोन खरेदीकडे ओढा होता. आॅनलाईनच्या जमान्यातही दुकानात जाऊन मोबाईल खरेदीला ग्राहकांनी प्राधान्य दिले. यंदा फोर-जी तंत्रज्ञानासह मोठ्या रॅम, प्रोसेसर आणि ब्रॅन्डेड कंपन्यांच्या मोबाईलची खरेदी प्रामुख्याने झाली. आॅनलाईन मार्केटच्या आॅफर्सना टक्कर देण्यासाठी शहरातील मोबाईल विक्रेत्यांनीही ग्राहकांना चांगल्या आॅफर देऊ केल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत दुकाने ग्राहकांनी फुलून गेली होती. मोबाईलच्या दुकानातही ग्राहकांना खरेदीसाठी तास-तासभर थांबावे लागत होते.
दिवाळीच्या मुहूर्तावर शहरात वाहन खरेदीची धूम दिसून आली. दसरा ते दिवाळीदरम्यान चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या विक्रीत २५ टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात आले. चारचाकी वाहनांसाठी तर दिवाळीपूर्वीच बुकिंग झाले होते. मोठ्या वाहनांच्या खरेदीवर पाच हजारापासून ते चाळीस हजारापर्यंत सवलती देण्यात आल्या होत्या. मोफत विमा, मोफत सेवा अशा आॅफर दिल्याने, आॅटोमोबाईल क्षेत्रात उत्साह दिसून आला. आॅनलाईन खरेदी करणाऱ्यांचे प्रमाणही यंदा मोठे होते. काही कुरिअर कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली असता, गतवर्षाच्या तुलनेत यंदा आॅनलाईन खरेदीचे प्रमाण अधिक होते. (प्रतिनिधी)
मोबाईल खरेदीसाठी गर्दी
मोबाईल खरेदीसाठी सांगली, मिरजेतील दुकानांमध्ये मोठी गर्दी होती. दुचाकी, चारचाकी व अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या तुलनेत मोबाईलच्या किमती कमी असल्याने एकूण उलाढाल कमी दिसत आहे. तरीही नगांचा विचार केला, तर मोबाईलची विक्री सर्वाधिक दिसून येते.
महिनाअखेर असल्यामुळे सुरुवातीला पाडव्यादिवशी होणाऱ्या उलाढालीविषयी शंका निर्माण झाली होती, मात्र दिवाळी सुरु झाल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळाला. पाडव्याच्या मुहूर्तावर आम्ही एकूण १ हजार २00 दुचाकी वाहनांची विक्री केली. दसरा आणि दिवाळीची एकूण वाहनविक्री ३ हजार २00 वर झाली आहे. यंदा ग्राहकांचा चांगला प्रतिसाद दिसून आला. खरेदीदारांमध्ये उत्साह दिसून येत होता. गतवर्षाच्या तुलनेत विक्रीमध्ये वाढ झाली आहे.
- श्रीकांत तारळेकर, संचालक, सिद्धिविनायक अ‍ॅटो, सांगली
मोबाईल आणि टीव्हीला ग्राहकांची मोठी मागणी होती. पाडव्याच्या मुहूर्तावर एलईडी टीव्ही खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल होता. गतवर्षाच्या तुलनेत यंदा टीव्हीच्या किमती सुमारे २० टक्क्यांनी कमी झाल्याने मोठ्या आकारातील टीव्हींना अधिक पसंती दिली जात होती. मोबाईल कंपन्यांनी पाडव्यासाठी अनेक आॅफर दिल्या असल्यामुळे ग्राहकांनी फोर जी तंत्रज्ञानाच्या मोबाईलची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. तुलनेने होमअप्लायंसेसना मागणी कमी होती.
- विजय लड्डा, संचालक, सुयोग राजेंद्र डिजिटल, सांगली
 

Web Title: 250 crore turnover bar fired in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.