२५० कोटींची द्राक्षे दिली फेकून; घडकूज रोगाची १० हजार एकरांवर लागण

By अशोक डोंबाळे | Published: January 7, 2024 10:20 AM2024-01-07T10:20:36+5:302024-01-07T10:21:02+5:30

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

250 crore worth of grapes were thrown away; Ghadkooz disease infection on 10 thousand acres | २५० कोटींची द्राक्षे दिली फेकून; घडकूज रोगाची १० हजार एकरांवर लागण

२५० कोटींची द्राक्षे दिली फेकून; घडकूज रोगाची १० हजार एकरांवर लागण

अशोक डोंबाळे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: कधी पाऊस, कधी धुके, कधी कडाक्याचे ऊन, तर कधी कडाक्याची थंडी अशा विचित्र हवामानामुळे यंदा द्राक्षांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अख्खा घडच सडत आहे. अवकाळी पावसामुळे घडांवर काळे व तपकिरी रंगाच्या पसरणाऱ्या ठिपक्यांमुळे सांगली जिल्ह्यातील दहा हजार एकरांतील द्राक्षबागांना फटका बसला आहे. घडकूजमुळे जवळपास २५० कोटी रुपयांची द्राक्षे शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकली आहेत.

सांगली जिल्ह्यात जवळपास एक लाख २५ हजार एकर द्राक्षबागांचे क्षेत्र आहे. या वर्षी नोव्हेंबर अखेरीस आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका मिरज, तासगाव तालुक्यातील द्राक्षबागांना बसला. काळे व तपकिरी रंगाचे ठिपके पडून द्राक्षाचे घड कुजून गेले. पहिल्या दिवशी गुंठ्यातील द्राक्ष मण्यांवर ठिपके पडल्यानंतर दोन दिवस पूर्ण द्राक्षबागांचेच नुकसान होत आहे. 

संपूर्ण घडच काढावा लागतो

या पद्धतीने प्रामुख्याने तासगाव, मिरज तालुक्यातील जवळपास दहा हजार एकर क्षेत्रातील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. घडकूजची लागण झालेला घड काढून फेकून द्यावा लागतो. अशाप्रकारे सुमारे जवळपास २५० कोटी रुपयांची द्राक्षे शेतकऱ्यांनी काढून रस्त्यावर फेकली आहेत.

द्राक्ष संशोधन केंद्राचे अधिकारी म्हणतात...

गेल्या पंधरा दिवसांपासून मण्यांवर जिवाणूजन्य करप्याची नव्याने लक्षणे दिसून येत आहेत. मण्यांच्या टोकावर व मण्यांवर काळे तपकिरी लहान, गोलाकार ठिपके आणि मणी कूज व मणी कोरडे होणे ही लक्षणे दिसून येत आहेत. हा रोग हा बुरशी व जिवाणू प्रजातीच्या प्रादुर्भावामुळे होत आहे, असे मत मांजरी, जि.पुणे येथील द्राक्ष संशोधन केंद्रातील अधिकाऱ्यांचे मत आहे.

सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे द्राक्षघडांवर काळे व तपकिरी रंगाचे ठिपके आले. मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात सुमारे पाच हजार एकर क्षेत्रातील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. 
- रायगोंडा पाटील, संचालक, द्राक्ष बागायत संघ

अवकाळी पावसामुळे सांगली जिल्ह्यातील १५ हजार हेक्टर क्षेत्रातील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला आहे, तसेच द्राक्षबागांतील घडांवर काळे व तपकिरी रंगाच्या पसरणाऱ्या ठिपक्यांमुळेही द्राक्षबागांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
- विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली

Web Title: 250 crore worth of grapes were thrown away; Ghadkooz disease infection on 10 thousand acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.