Sangli: उपळावीत उष्माघाताने अडीचशे कोंबड्या मृत, लाखाचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 05:15 PM2024-05-21T17:15:04+5:302024-05-21T17:16:02+5:30
कवठे एकंद : उपळावी (ता. तासगाव) येथील शेतकरी विठ्ठल शंकर शिंदे यांच्या पोल्ट्रीतील २५० कोंबड्या उन्हाच्या तडाख्यामुळे अस्वस्थ होऊन ...
कवठे एकंद : उपळावी (ता. तासगाव) येथील शेतकरी विठ्ठल शंकर शिंदे यांच्या पोल्ट्रीतील २५० कोंबड्या उन्हाच्या तडाख्यामुळे अस्वस्थ होऊन मृत्युमुखी पडल्या. सोमवारी सकाळी ही बाब निदर्शनास आली. या उष्माघाताच्या संकटात शिंदे यांचे सुमारे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
शेतकरी विठ्ठल शिंदे यांनी शेतीला जोडधंदा म्हणून बँकेकडून कर्ज घेऊन कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे. मतकुणकी-कुमठे रोडवर उपळावी येथे सुमारे ७००० पक्ष्यांचे शेड त्यांनी उभारले आहे. त्यामध्ये २००० पोल्ट्रीच्या कोंबड्या आहेत.
गेल्या महिनाभरापासून उन्हाच्या तीव्रतेमुळे दीडशेवर कोंबड्या दगावल्या आहेत. तर त्यातील अचानकपणे रविवारी सायंकाळी २५० कोंबड्या उन्हाच्या तडाख्यामुळे अस्वस्थ होऊन मृत्युमुखी पडल्या आहेत. सदर घटनेचा पंचनामा केला आहे. तीव्र उन्हामुळे नैसर्गिक आपत्ती आली आहे. तरी शासनाने मदत करावी, अशी अपेक्षा शिंदे कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
सध्या सातत्याने कडक ऊन असल्यामुळे कोंबड्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी फॅन, पाण्याचे फवारे अशा उपाययोजना केल्या आहेत. परंतु चार-पाच तास विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे उपाययोजनेत अडचणी येतात. हिट स्ट्रोक बसल्यामुळे कोंबड्यांचा मृत्यू होऊन मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कर्ज काढून जोडधंदा सुरू केला आहे. मात्र, या अचानक आलेल्या आपत्तीमुळे आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. -विठ्ठल शिंदे, पोल्ट्रीधारक शेतकरी, उपळावी, ता. तासगाव