तासगाव तालुक्यात कोरोनाचे २८ दिवसांत २६ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:20 AM2021-04-29T04:20:13+5:302021-04-29T04:20:13+5:30
तासगाव : तासगाव तालुक्यात कोरोनोची दुसरी लाट गंभीररूप धारण करीत आहे. आटोक्यात आलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येने पुन्हा एक हजारचा ...
तासगाव : तासगाव तालुक्यात कोरोनोची दुसरी लाट गंभीररूप धारण करीत आहे. आटोक्यात आलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येने पुन्हा एक हजारचा आकडा ओलांडला आहे. तालुक्यात प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू असले तरी तुटपुंंज्या यंत्रणेमुळे आणि नागरिकांच्या गाफीलपणामुळे कोरोनोचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. बुधवारी पहाटे नरसेवाडीतील एका वृद्ध महिलेचा उपचारासाठी बेड न मिळाल्याने मृत्यू झाला. गेल्या २८ दिवसांत तालुक्यात तब्बल २६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
तासगाव तालुक्यात कोरेानोची पहिली लाट ओसरल्यानंतर प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला होता. मात्र, दुसऱ्या लाटेत तालुक्यात पुन्हा भीषण परिस्थिती निर्माण होताना दिसून येत आहे. महिन्याभरापासून तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात रोज शंभरच्या संख्येने कोरोनाबाधित होत आहेत. विशेषत: शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोनोचा विळखा वाढत आहे.
तालुक्यात आजअखेर ५ हजार ७९ कोरोनाबाधित रुग्ण होते, त्यापैकी ३ हजार ८६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य:स्थितीत तालुक्यात एक हजार १४ कोरोनाबाधित असून, त्यापैकी ७९२ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. २२२ रुग्णांवर कोविड रुग्णालयांतून उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आजअखेर १९९ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी गेल्या २८ दिवसांत २६ मृत्यू झाले आहेत. दुसऱ्या लाटेत तालुक्यातील कोरोनाबाधितांचा मृत्युदर चिंताजनक झाला आहे.
प्रशासनाकडून रात्रंदिवस कोरोनाविरोधात लढाई सुरू आहे. मात्र, या लढाईत उपचारांसाठीची यंत्रणाच तुटपुंजी असल्यामुळे कोरोनोचा विळखा वाढत आहे. बुुधवारी नरसेवाडीतील एका रुग्णाला वेळेत उपचारांसाठी बेड न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागला. कोरोनाबाधित होऊन अत्यवस्थ स्थितीत असलेल्या रुग्णांची उपचाराची सोय मिळविण्यासाठी फरफट सुरू असल्याचे चित्र आहे.
चौकट
जीव मुठीत घेऊन अंत्यसंस्कार; दोघे पॉझिटव्ह
नरसेवाडी येथील कोरोनोबाधित रुग्णाचा उपचारांअभावी मृत्यू झाल्यानंतर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पीपीई कीट उपलब्ध न झाल्याने घरातीलच व्यक्तींनी अंत्यसंस्कार केले. त्यांच्या कुटुंबीयांच्या तपासणीत आणखी दोन व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत.
चौकट
ग्रामीण भागात वाढता विळखा
दुसऱ्या लाटेत शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनेक गावांत रोज आठ, दहा रुग्ण कोरोनाबाधित होत आहेत. गाव पातळीवर दक्षता समित्या स्थापन करून नियमांची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, लोकांनीच दुसरी लाट गांभीर्याने घेतली नसल्याने रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.