सांगलीवाडी टोलनाक्यावर २६ लाखाची चांदी जप्त; शहर पोलिसासह निवडणूक पथकाची कामगिरी
By घनशाम नवाथे | Published: April 12, 2024 11:32 PM2024-04-12T23:32:32+5:302024-04-12T23:32:49+5:30
निवडणूक आयोगाच्या विशेषाधिकार समितीकडे तसेच आयकर विभाग, जीएसटी विभागाकडे कारवाईचा अहवाल पाठवला आहे.
घनशाम नवाथे
सांगली : येथील सांगलीवाडी टोलनाक्यावर शहर पोलिस व निवडणूक पथकाने शुक्रवारी दुपारी नाकाबंदीवेळी मोटारीतून विनापरवाना वाहतूक केले जाणारे २५ लाख ९२ हजार रूपयांचे ४१ किलो ५५७ ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले. निवडणूक आयोगाच्या विशेषाधिकार समितीकडे तसेच आयकर विभाग, जीएसटी विभागाकडे कारवाईचा अहवाल पाठवला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सांगलीवाडी टोलनाका येथे निवडणूक पथकातील पोलिस कर्मचारी निशांत मागाडे, संदीप नागरगोजे हे निवडणूक पथकाचे प्रमुख निखील म्हांगोर, कर्मचारी शंकर भंडारी, प्रमोद भिसे हे नाकाबंदी करत होते. तेव्हा दुपारी १२ च्या सुमारात मोटार (एमएच १० सीए ८६३०) मधून देवेंद्र बाबुलाल माळी (वय २०, रा. शिराळकर कॉलनी, आष्टा, ता. वाळवा) हा विना परवाना चांदीच्या दागिन्यांची वाहतूक करत होता. पथकाने मोटार अडवल्यानंतर तपासणीमध्ये चांदीचे दागिने दिसले. शहर पोलिस निरीक्षक संजय मोरे यांना हा प्रकार कळवला. त्यांच्या सुचनेनुसार उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण व पथकाने सांगलीवाडी येथे जाऊन पंचासमक्ष झडती घेऊन २५ लाख ९२ हजार ११४ रूपयांचे ४१ किलो ५५७ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने जप्त केले.
शहर पोलिस व निवडणूक पथकाने केलेल्या कारवाईची माहिती निवडणूक आयोगाने स्थापन केलेल्या विशेषाधिकार समितीकडे तसेच आयकर विभाग, जीएसटी विभाग यांच्याकडे अहवालाद्वारे पाठवण्यात आली.