शस्त्र तस्कराकडून २६ पिस्तूल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 04:54 PM2017-10-11T16:54:34+5:302017-10-11T16:59:12+5:30
पिस्तुलांची तस्करी करणाºया टोळीकडून २६ पिस्तुल, ६५ जिवंत काडतुसे याच्यासह शस्त्रनिमिर्ती साहित्य असा १० लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी बुधवारी दिली.
सांगली,11 : सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पिस्तुलांची तस्करी करणाºया रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोण्यात सांगली पोलिसांना यश आले आहे. या तस्करीचा मुख्य सुत्रधार प्रतापसिंह बहादूरसिंग भाटीया (वय ४५, रा. लालबाग, ता. धरमपूरी, जि. धार, मध्यप्रदेश) याच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे.
या टोळीकडून आतापर्यंत २६ पिस्तुल, ६५ जिवंत काडतुसे याच्यासह शस्त्रनिमिर्ती साहित्य असा १० लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिली. यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख दत्तात्रय शिंदे उपस्थित होते.
गेल्या आठवड्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पिस्तूलांची तस्करी करणाºया सनीदेव प्रभाकर खरात (वय २०, रा. सिंधु-बुद्रुक, दहीवडी, ता. माण, जि. सातारा) व संतोष शिवाजी कुंभार (२७, नागझरी, ता. कोरेगाव, जि. सातारा) या दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून देशी बनावटीची सात पिस्तूल, २७ जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला होता.
दोघांच्या चौकशीत त्यांनी ही पिस्तुले मध्य प्रदेशमधून तस्करी केल्याची कबूली दिली होती. चार दिवसापूर्वी पोलिस निरीक्षक राजन माने यांचे पथक संशयित खरात व कुंभार या दोघांना घेऊन मध्य प्रदेशला रवाना झाले होते. तेथील पोलिसांच्या मदतीने पथकाने प्रतापसिंग भाटिया याच्या मुसक्या आवळल्या होत्या. यावेळी त्याच्याकडून सहा देशी बनावटीचे पिस्टल हस्तगत करण्यात आले. त्याची किंमत ३ लाख रुपये इतकी आहे.
भाटीया याची कसून चौकशी केली असताना त्याने घरात आणखी शस्त्रे लपविल्याची कबुली दिली. त्यानुंतर पुन्हा पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे एक रिव्हॉल्व्हर, एक पिस्टल, ८ गावठी कट्टे, २७ जीवंत काडतुसे याच्यासह शस्त्र निर्मितीसाठी लागणारे दोन कानस, चिमटा, हातोडाल, सळी, एक्सा ब्लेड असा १ लाख ८५ हजार रुपयांचा माल मिळून आला.
भाटीया याने नागठाणे (ता. कराड, जि. सातारा) येथील अजीमर अकबर मुल्ला या एजंटाला पिस्तुल विकल्याची माहिती दिली. त्यानुसार पथकाने अजीमर मुल्ला या ताब्यात घेऊन त्याच्याकडील दोन पिस्टल, एक रिव्हॉल्व्हर, १० जीवंत काडतुसे असा १ लाख ५२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
आतापर्यंत पोलिसांनी २६ अग्निशस्त्रे जप्त केली असून त्यात १६ पिस्टल, २ रिव्हॉल्व्हर, ८ गावठी कट्टे, ६४ जीवंत काडतुसे व शस्त्रनिर्मितीचे साहित्य असा ९ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.