कार्वे येथे डाकपालाकडून २६ हजार रुपयांचा अपहार
By admin | Published: June 25, 2015 10:50 PM2015-06-25T22:50:27+5:302015-06-25T22:50:27+5:30
पोस्ट खात्यातील अपहार झाल्याचे स्पष्ट केले. या प्रकाराचा संशय कांबळे याच्यावर आल्याने डाक निरीक्षक श्रीकांत माने व वायदंडे यांनी कार्वे पोस्टातील खातेदारांच्या दफ्तरांची तपासणी केली.
विटा : पोस्टातील बचत खातेदाराच्या पुस्तकावर रक्कम जमा केल्याची खोटी नोंद करून पोस्टातील व महिला बचत खातेदाराच्या २६ हजार ३२५ रुपयेंचा अपहार केल्याप्रकरणी कार्वे (ता. खानापूर) येथील पोस्टातील डाकपाल विनोद विठ्ठल कांबळे (रा. कार्वे, ता. खानापूर) याच्याविरुध्द गुरुवारी विटा पोलिसात गुन्हा दाखल केला. विटा विभागाचे डाक निरीक्षक श्रीकांत माने यांनी फिर्याद दिली.
विटा पोस्ट कार्यालयांतर्गत कार्वे येथील डाकघर आहे. तेथे १९९७ पासून विनोद कांबळे डाकपाल म्हणून काम करीत आहे. दि. १८ आॅक्टोबर २०१३ ते दि. १६ जुलै २०१४ या कालावधीतील कार्वे डाकघरातील दफ्तराची तपासणी एस. एस. वायदंडे यांनी केली. पोस्टाच्या खात्यातील ८ हजार ३२५ रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट केले. या प्रकाराचा संशय कांबळे याच्यावर आल्याने डाक निरीक्षक श्रीकांत माने व वायदंडे यांनी कार्वे पोस्टातील खातेदारांच्या दफ्तरांची तपासणी केली.बचत खातेदार सुलाबाई तानाजी जाधव यांच्या खाते पुस्तकावर १८ हजार रुपयांची खोटी नोंद केल्याचे स्पष्ट झाले. मात्र, ही रक्कम कांबळे याने पोस्ट खात्यावर जमा केली नाही. त्यामुळे कार्वे पोस्टातील डाकपाल कांबळे याने पोस्टाच्या ८ हजार ३२५ व महिला बचत खातेदार सौ. सुलाबाई जाधव यांची १८ हजार असा एकूण २६ हजार ३२५ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी कांबळे याच्याविरुध्द गुरुवारी विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक आर. बी. वाघमोडे पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)