सांगली जिल्ह्यात २६ पासून होणार ‘स्वच्छतेचा महाजागर’ : अभिजित राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:21 PM2019-01-14T23:21:50+5:302019-01-14T23:25:45+5:30
अस्वच्छताच अनेक आजारांना निमंत्रण देत असल्यामुळे, स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जागृती होण्याची नितांत गरज आहे.
सांगली : अस्वच्छताच अनेक आजारांना निमंत्रण देत असल्यामुळे, स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जागृती होण्याची नितांत गरज आहे. संतसाहित्यातील स्वच्छतेचा संदेश प्रवचनकार समाजापर्यंत चांगल्याप्रकारे पोहोचवतील. म्हणून २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०१९ या कालावधित ‘स्वच्छतेचा महाजागर’ हा उपक्रम जिल्ह्यातील ६९९ गावांमध्ये ६० प्रवचनकारांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
जिल्हा परिषदेत जिल्हा पाणी, स्वच्छता मिशन कक्ष व वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छतेचा महाजागर’ या अभियानाच्या पूर्वतयारीच्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, वारकरी साहित्य परिषदेच्या महिला आघाडी प्रमुख मालुश्री पाटील, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब नरुटे, विभागीय समन्वयक चंद्रकांत कचरे आदी उपस्थित होते.
अभिजित राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासन (पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग) व वारकरी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील ४४ हजार गावांमध्ये प्रवचनाच्या माध्यमातून ‘स्वच्छतेचा महाजागर’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद व वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून ६९९ गावांमध्ये २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०१९ या कालावधित ‘स्वच्छतेचा महाजागर’ हा उपक्रम ६० प्रवचनकारांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. संतसाहित्यातून स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली आहे आणि समाजावर संतांच्या विचारांचा पगडा असल्याने, शाश्वत स्वच्छतेसाठी प्रवचनकारांचा चांगला उपयोग होईल. मालुश्री पाटील म्हणाल्या, स्वच्छतेचा जागर करण्यासाठी वारकरी साहित्य परिषद पूर्ण सहकार्य करेल. वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब नरुटे यांनी यावेळी उपस्थित प्रवचनकारांना मार्गदर्शन केले.
ग्रामस्थांना मार्गदर्शन
दीपाली पाटील यांनी स्वच्छता अभियानातील सद्यस्थिती व स्वच्छतेच्या उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. गावपातळीवर दिलीप मस्के, सतीश जाधव, सुनील सावंत व चंद्रकांत कचरे यांनी मार्गदर्शन केले.