महापूर नियंत्रणासाठी २७ पानी अहवाल सादर, सांगलीत आजपासून साखळी उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 01:30 PM2022-08-22T13:30:23+5:302022-08-22T13:31:01+5:30

प्रशासनाचा हलगर्जीपणा ठरतोय मारक

27 page report submitted for flood control, Fasting in Sangli from today | महापूर नियंत्रणासाठी २७ पानी अहवाल सादर, सांगलीत आजपासून साखळी उपोषण

संग्रहित फोटो

googlenewsNext

सांगली : सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील महापूर नियंत्रणासाठी नागरी कृती समितीने २७ पानांचा अभ्यास अहवाल शासनाला सादर केला आहे. त्यातील शिफारशींकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारपासून (दि. २२) कार्यकर्ते व पूरग्रस्त भागातील नागरिक सांगलीत साखळी उपोषण करणार आहेत.

सकाळी ११ वाजता आरती गणपती करून मंदिरासमोर आंदोलनाची सुरुवात होईल. समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी सांगितले की, महापुरामुळे पश्चिम महाराष्ट्राची अब्जावधी रुपयांची हानी झाली आहे. महापुरावर नियंत्रण करता येऊ शकते असा समितीचा दावा आहे. त्यासाठी शास्त्रशुद्ध अभ्यास केला आहे. अभ्यासाअंती आढळलेली निरीक्षणे, उपायांचा अहवाल मुख्य सचिव व जलसंपदाच्या सचिवांना सादर केला आहे. त्यातील शिफारशींची अंमलबजावणी केल्यास पूर नियंत्रण आणता येईल. त्यासाठी बिनखर्चाचे आणि खर्चाचेही पर्याय सुचविले आहेत.

पाटील म्हणाले, अहवालासाठी जलअभ्यासक, शास्त्रज्ञ, अभियंते, स्पंदन संस्था, आंदोलन अंकुश, शिवाजी विद्यापीठ, ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव, ड्रोन सर्वेक्षण, कंटूर सर्वेक्षण, प्रत्यक्ष नदीकाठावरील परिस्थितीचा अभ्यास आदींचा आधार घेतला आहे. त्यातील शिफारशी वास्तवाशी निगडीत आहेत. राज्य शासन व पाटबंधारेने काही शिफारशींची अंमलबजावणी केली, मात्र बऱ्याच बाबींवर कार्यवाही झालेली नाही.

याकडे लक्ष वेधण्यासाठीच नागरी साखळी उपोषणाची हाक दिली आहे. शिरोळमधून "आंदोलन अंकुश" चे कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत. यावेळी विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ, हणमंतराव पवार, संजय कोरे, नीलेश पवार, सचिन सगरे, दिनकर पवार आदी उपस्थित होते.

प्रशासनाचा हलगर्जीपणा ठरतोय मारक

समितीने दावा केला की, धरण व्यवस्थापनाविषयी केंद्र सरकारच्या काही नियमांवर अंकुश गरजेचा आहे. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. राज्याची व जिल्ह्याची महापूर नियंत्रण सुरक्षा समिती अद्याप गठीत केलेली नाही. अलमट्टी धरणातील पाणीसाठा व विसर्गाविषयी नियमांचे पालन कर्नाटक सरकार करत नाही. धरणांच्या एकात्मिक व्यवस्थापनाकडे कानाडोळा केला जातो. सांगलीत शामरावनगरमध्ये गेल्या पावसाळ्यातील पाण्याचा निचरा अजूनही झालेला नाही. नाले स्वच्छ केलेले नाहीत. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाखालून पाण्याला वाट ठेवलेली नाही. बेंच मार्क चुकीचे आहेत. बंधाऱ्यांतील बरंगे पावसाळ्यापूर्वी वेळेवर काढले व बसविले जात नाहीत..

Web Title: 27 page report submitted for flood control, Fasting in Sangli from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.