सांगली जिल्ह्यात तीन महिन्यांत वाढले २७ हजार ७४३ मतदार; कुणाला फायदा होणार?
By अशोक डोंबाळे | Published: May 4, 2024 06:19 PM2024-05-04T18:19:42+5:302024-05-04T18:25:31+5:30
बुथ एजंटांना मोबाईल नो अलाऊड
सांगली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी २२ जानेवारीला २४ लाख ९ हजार ७७ मतदार होते. तर तीन महिन्यानंतर जिल्ह्यातील मतदारांची एकूण संख्या २४ लाख ३६ हजार ८२० झाली आहे. तीन महिन्यांत तब्बल २७ हजार ७४३ मतदार वाढले आहेत. हे वाढलेले मतदार उमेदवाराच्या विजयासाठी निर्णायक ठरू शकतात.
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी मिरज, सांगली, पलूस-कडेगाव, खानापूर, तासगाव-कवठेमहांकाळ, जत अशा सहा विधानसभा मतदारसंघाचा सांगली लोकसभा मतदारसंघ आहे. तसेच उर्वरित इस्लामपूर, शिराळा हे दोन विधानसभा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघात येत आहेत. जिल्हा प्रशासनाने २२ जानेवारीला मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध केली. यावेळी २४ लाख ९ हजार ७७ मतदार होते. एप्रिलअखेरपर्यंत नवमतदारांनी नोंदणी केली असून २७ हजार ७४३ मतदार वाढले आहेत. सध्या २४ लाख ३६ हजार ८२० मतदारसंख्या झाली आहे. वाढलेल्या मतदाराचा कोणत्या उमेदवाराला फटका बसणार आणि कुणाला फायदा होणार हे दि. ७ मे रोजीच समजणार आहे.
निवडणुकीसाठी सध्या १२ हजार २७५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांच्या खरोखर अडचणी होत्या त्यांची ड्युटी रद्द करण्यात आली आहे. आचारसंहिता अंमलबजावणी व उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात क्षेत्रीय अधिकारी, स्थिर सर्वेक्षण अधिकारी, भरारी पथके, व्हिडीओ सर्वेक्षण पथके अशी एकूण ६८ पथके जिल्ह्यात कार्यरत आहेत.
बुथ एजंटांना मोबाईल नो अलाऊड
मतदानादिवशी बुथ एजंट म्हणून काम करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाता येणार नाही. त्याठिकाणी केवळ मतदान केंद्राध्यक्षांकडेच मोबाईल असणार आहे. त्याशिवाय इतर कोणाकडेही मोबाईल नसेल, याची दक्षता घेण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. मतदान करायला जाणाऱ्या व्यक्तीलाही मोबाईल शूटिंग करता येणार नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.