सांगलीत कृष्णा नदीत बुडून 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू, परिसरात हळहळ
By शीतल पाटील | Published: November 14, 2022 09:00 PM2022-11-14T21:00:42+5:302022-11-14T21:01:11+5:30
आकाश ऐवळे कुटुंबीयांसह विश्रामबाग परिसरात हनुमाननगर येथे राहतो
सांगली : कृष्णा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या आकाश श्रीकांत ऐवळे (वय २७, रा. हनुमाननगर, सांगली) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. १३) दुपारी साडेतीनच्या सुमारास स्वामी समर्थ घाटावर घडली. त्याचा मृतदेह सोमवारी सकाळी पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. शहर पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आकाश ऐवळे कुटुंबीयांसह विश्रामबाग परिसरात हनुमाननगर येथे राहतो. रविवारी दुपारी मित्रांसह पोहण्यासाठी कृष्णा नदीत उतरला होता. पण, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडाला. मित्रांनी घटनेची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली. त्यांनी तातडीने नदीकडे धाव घेतली. आयुष हेल्पलाइन पथकासह अग्निशमन दलानेही आकाशच्या शोधासाठी त्वरित मोहीम हाती घेतली. यांत्रिक बोटीसह शोधमोहीम राबवण्यात आली. महेश कुमारमठ, मारुती कोळी, यशवंत गडदे, फिरोज शेख, अनिल कोळी, अक्षय कुमारमठ, ओंकार रजपूत, संतोष कामते, योगेश मेढीगिरी, योगेश आवटी, गणेश आवटी, सय्यद राजेवाले, जोतीबा तोरसे आदी तरुणांनी सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेतला. अखेर सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळून आला. शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी झाली.