'प्रधानमंत्री आवास' योजने'चा २.७० कोटींचा निधी गेला परत, सांगली महापालिकेला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 04:11 PM2022-06-28T16:11:08+5:302022-06-28T16:29:55+5:30
दीड महिन्यापूर्वी हा निधी पालिकेच्या खात्यावर वर्ग झाला होता. पण त्याचे वितरण करण्यात दिरंगाई करण्यात आल्याने लाभार्थ्यांत असंतोष निर्माण झाला आहे.
सांगली : महापालिका क्षेत्रातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्राप्त २ कोटी ७० लाख रुपयांचा निधी शासनाने परत मागविला आहे. त्याबाबत कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. त्यामुळे आता लाभार्थ्यांना निधीसाठी आणखी वाट पहावी लागणार आहे. दीड महिन्यापूर्वी हा निधी पालिकेच्या खात्यावर वर्ग झाला होता. पण त्याचे वितरण करण्यात दिरंगाई करण्यात आल्याने लाभार्थ्यांत असंतोष निर्माण झाला आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महापालिकेकडून पाच डीपीआर सादर करण्यात आले होते. सुमारे ५१६ लाभार्थ्यांच्या घरकुलाचे स्वप्न या योजनेतून पूर्ण होणार होते. यातील १७१ लाभार्थ्यांच्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्यासाठी शासनाकडून दोन कोटी ७० लाख ९५ हजार रुपयांचा निधी दीड महिन्यापूर्वी खात्यावर वर्ग झाला. पण बारकोड चुकल्याने त्याचे वाटप लांबले. दोन दिवसांपूर्वी बारकोडमध्ये दुरुस्ती करण्यात आली. अनुदान वितरणाची तयारी सुरू असतानाच शासनाकडून हा निधी परत मागवून घेण्यात आला. त्यामुळे लाभार्थ्यांचे अनुदान वितरण ठप्प झाले आहे.
याबाबत प्रधानमंत्री आवास योजनेचे अध्यक्ष जगन्नाथ ठोकळे यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, या योजनेतील लाभार्थ्यांना तातडीने लाभ देण्यासाठी महापालिका स्तरावर कोणतेच प्रयत्न होत नाहीत. प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्यही मिळत नाही. त्यात आता निधी परत गेल्याने लाभार्थ्यांना काय उत्तर द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने तातडीने पाठपुरावा करून हा मंजूर निधी परत आणावा, अशी मागणीही त्यांनी केली.