गावकऱ्यांची एकी लय भारी; सांगली जिल्ह्यातील २८ ग्रामपंचायती बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 03:24 PM2022-12-08T15:24:20+5:302022-12-08T15:24:54+5:30
कडेगाव तालुक्यातील उपाळावी (मायणी), शाळगाव गावच्या ग्रामस्थांनी निवडणुकीवरच बहिष्कार घातला आहे.
सांगली : जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये बुधवारी अर्ज माघारीच्या दिवशी २८ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. तसेच कडेगाव तालुक्यातील उपाळावी (मायणी), शाळगाव गावच्या ग्रामस्थांनी निवडणुकीवरच बहिष्कार घातला आहे. यामुळे ४१९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.
आमदार अनिल बाबर यांच्या गार्डी ग्रामपंचायतीसह ढवळेश्वर, माधळमुठी, घोटी खुर्द, वासुंबे, धोंडेवाडी, धोंडगेवाडी, गोरेवाडी या आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. रेवणगाव ग्रामपंचायतीचे सर्व ७ सदस्य यापूर्वीच बिनविरोध झाले असले तरी सरपंच पदासाठी या गावात तिरंगी लढत होत आहे.
कडेगाव : तालुक्यात अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी येवलेवाडी, विहापूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे. उपाळावी (मायणी), शाळगाव ग्रामपंचायतींमधील मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे.
तासगाव : तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींपैकी आरवडे, चिंचणी ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात सर्वपक्षीय नेत्यांना यश आले आहे. मिरज तालुक्यातील सावळवाडी, जत तालुक्यातील देवनाळ, शिंगणापूर, पलूस तालुक्यातील हजारवाडी, पुणदीवाडी आदी ग्रामंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करण्यात स्थानिक नेत्यांना यश आले आहे.
शिराळा : तालुक्यातील वाकाईवाडी, खुंदलापूर, चिखली, शिंदेवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.
सरपंच बिनविरोध, सदस्यांसाठी निवडणूक
जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. परंतु, सदस्य पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज राहिल्यामुळे तेथील निवडणूक लागली आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये सदस्य बिनविरोध निवडून आले असून, सरपंच पदासाठी निवडणूक लागली आहे. निवडणुकीचे वेगवेगळे रंग सर्वत्र पहायला मिळत आहेत.
एकनाथ शिंदे गटाच्या पाच ग्रामपंचायती बिनविरोध
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेनेचे आमदार अनिल बाबर गटाने खानापूर तालुक्यातील एकूण आठ ग्रामपंचायती बिनविरोध काबीज केल्या आहेत. यापैकी गार्डी, ढवळेश्वर, माधळमुठी, वासुंबे, धोंडेवाडी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविराेध करून खाते खोलले आहे. उर्वरित तीन ग्रामपंचायती विराेधकांच्या ताब्यात गेल्या आहेत.
प्रचाराची तयारी
अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर आता प्रचार रंगणार असून त्याची तयारी उमेदवारांनी अगोदरच केली आहे.
प्रशासनाचा रात्री उशिरापर्यंत गोंधळ
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज माघारीची मुदत बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंतची होती. पण, प्रशासनाकडून अर्ज माघारीची संख्या आणि बिनविरोध ग्रामपंचायती यांचा ताळमेळ घालण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालूच होते.
वाळवा : तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींपैकी येलूर, कोळे, गौंडवाडी, धोत्रेवाडी, विठ्ठलवाडी, शिवपुरी, भरतवाडी या सात ग्रामपंचायती बिनविरोध करून गावांनी एकसंधपणा दाखविला आहे.
कामेरी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात दोन्ही गटांना अपयश आले. चार अर्ज राहिल्याने निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले. सरपंच पदासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी प्रणीत भैरवनाथ पॅनेलकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत जगदीश पाटील यांना विरोधी छगनबापू पाटील पॅनेलने पाठिंबा दिला आहे. त्यांच्याशिवाय विक्रम हिंदूराव पाटील, रघुनाथ हळदे - पाटील व हंबीरराव पाटील या तिघांचे सरपंच पदासाठी अर्ज राहिले आहेत.
वाळवा ग्रामपंचायतीत थेट सरपंच पदासाठी हुतात्मा गटातील संदेश कांबळे विरुद्ध राष्ट्रवादीचे विद्याजीतराजे धनवडे यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे.
बोरगाव : येथील ग्रामपंचायत निवडणुकीतून दोन अपक्षांनी सरपंच पदासाठीचे अर्ज माघारी घेतल्याने सत्ताधारी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी दुरंगी लढत रंगणार आहे.