मिरज महापालिका कार्यालयावर दगडफेकप्रकरणी २८ जणांची निर्दोष मुक्तता - अकरा वर्षांनंतर निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 08:28 PM2018-05-02T20:28:14+5:302018-05-02T20:28:14+5:30
मिरज : महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयावर दगडफेक केल्याप्रकरणी मिरज न्यायालयाने दोषी ठरविलेल्या
मिरज : महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयावर दगडफेक केल्याप्रकरणी मिरज न्यायालयाने दोषी ठरविलेल्या माजी महापौर इद्रिस नायकवडी, मैनुद्दीन बागवान, नगरसेवक सुरेश आवटी, मकरंद देशपांडे यांच्यासह २८ जणांची जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाच्या या निकालाने या सर्वांना महापालिकेची निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिकेतील गैरकारभार, मिरज शहरातील रस्ते व पिण्याच्या पाणीप्रश्नावर २००७ मध्ये शहरातील नगरसेवक, रिक्षाचालक, शेतकरी संघटना व नागरिकांचा सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चावेळी दगडफेक करून कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी मिरज शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या खटल्यात मिरजेतील प्रथमवर्ग न्यायालयाने २०११ मध्ये आजी, माजी नगरसेवकांसह २८ जणांना दोषी ठरवून दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. या निकालामुळे दोषी ठरविण्यात आलेल्या नगरसेवकांना निवडणूक लढविण्यात अडचणी आल्याने त्यांची राजकीय कारकीर्द अडचणीत आली होती.
या निकालाविरोधात सांगलीच्या जिल्हा न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते. २८ जणांच्यावतीने तीन अपील दाखल होते. या तीन याचिकाकर्त्यांच्यावतीने अॅड. प्रशांत नरवाडकर, गिरीश तपकिरे, सी. डी. माने यांनी काम पाहिले. शिक्षेविरोधात दाखल करण्यात आलेले अपील बुधवारी जिल्हा न्यायालयाने मंजूर करून माजी महापौर मैनुद्दीन बागवान, इद्रिस नायकवडी, नगरसेवक सुरेश आवटी, मकरंद देशपांडे, आनंदा देवमाने व संभाजी मेंढे यांच्यासह २८ जणांची खटल्यातून निर्दोष मुक्तता केली. जिल्हा न्यायालयाच्या या निकालाने सर्वांना दिलासा मिळाला आहे. या खटल्यातील दादासाहेब लांडगे, जयगोंड परगोंड, इब्राहिम चौधरी या तीन माजी नगरसेवकांचे निधन झाले आहेत. या खटल्याचा निकाल अकरा वर्षांनी लागला.
न्यायालयाच्या निकालावर समाधानी - इद्रिस नायकवडी
महापालिका मिरज विभागीय कार्यालयावर नागरिकांच्या हितासाठी सत्ताधाऱ्यांच्याविरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोर्चाबाहेरील काहींनी महापालिकेच्या मिरज कार्यालयावर दगडफेक केली होती. या दगडफेकीत बाराशे रुपयांचे किरकोळ नुकसान झाले होते. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी प्रशासनावर दबाव टाकून २८ जणांवर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले होते. याप्रकरणी मिरज न्यायालयाने शिक्षा व दंड ठोठावला होता. याविरोधात जिल्हा न्यायालयात अपील केले होते. न्यायालयाने हे अपील मान्य केल्याने सर्वांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या या निकालावर समाधानी असल्याचे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी सांगितले.