तरसाच्या हल्ल्यात मेंढ्यांच्या २८ कोकरांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:25 AM2021-03-06T04:25:06+5:302021-03-06T04:25:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा/तांदूळवाडी : बहाद्दूरवाडी (ता. वाळवा) येथे तरसाच्या हल्ल्यात एक ते तीन महिने वयाची मेंढरांची २८ कोकरं ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा/तांदूळवाडी : बहाद्दूरवाडी (ता. वाळवा) येथे तरसाच्या हल्ल्यात एक ते तीन महिने वयाची मेंढरांची २८ कोकरं मृत्युमुखी पडली, तर दोन गंभीर जखमी झाली. ही घटना गुरुवारी सायंकाळी सव्वापाचच्या दरम्यान घडली. याबाबत शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन करून पंचनामा करण्यात आला.
बहाद्दूरवाडीत सागर माने, रामचंद्र गोरडे, अभिजित माने, सुरेश बादरे, शिवाजी गोरडे, धनाजी गोरडे, अर्जुन माने, मय्याप्पा सांगले, मंगेश विष्णू माने असे नऊ मेंढपाळ आहेत. त्यांच्याकडे सहाशेच्या दरम्यान मेंढ्या आहेत.
याच गावातील सागर पाटील यांच्या शेतात या मेंढ्या बसवण्यात आल्या होत्या. गुरुवारी सकाळी दहाच्या दरम्यान हे सर्व मेंढपाळ मोठ्या मेंढ्या गावात चरण्यासाठी बाहेर घेऊन गेले. लहान पिल्लांना घेऊन जाणे शक्य नसल्याने दहा डालग्यांमध्ये ती झाकून ठेवली होती. सायंकाळी सव्वापाचच्या दरम्यान मेंढ्यांना चरवून सर्वजण शेतात आले असता तेथे गोंधळ सुरू असलेला दिसला. डालगी इतरत्र पसरलेली दिसली तसेच दोन हिंस्र प्राण्यांनी येथील पिल्लांवर हल्ला करून मारल्याचे शेतकरी सागर पाटील यांनी सांगितले. पाटील व इतर नागरिकांनी आरडाओरडा केल्याने तरस पळून गेले.
डालगी उघडून पाहिली असता त्यामध्ये २६ कोकरू मृतावस्थेत आढळली, तर जवळच्या विहिरीतही दोन कोकरू मृत आढळली. दोन कोकरू गंभीर जखमी झालेली दिसून आली.
यामध्ये सागर माने यांची बारा कोकरू मृत व दोन जखमी, रामचंद्र गोरडे यांची आठ कोकरू मृत, अभिजित माने यांची सहा कोकरू मृत, सुरेश बादरे यांची दोन कोकरू मृतावस्थेत आढळून आली. या घटनेची माहिती वनविभागास कळवली असता वनक्षेत्रपाल सुशांत काळे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.
प्रत्यक्ष हल्ला पाहिलेल्या सागर पाटील यांना प्राण्यांचे फोटो दाखवले असता हा हिंस्त्र प्राणी तरस असल्याचे निष्पन्न झाले.
चौकट
घटनास्थळी गर्दी आणि हळहळ
२८ मृत व दोन गंभीर जखमी कोकरू पाहून हळहळ व्यक्त होत होती. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री शवविच्छेदन करता येत नसल्याने शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले.
कोट
वैद्यकीय अधिकारी जी किंमत ठरवतील, त्याप्रमाणे या मेंढपाळांना शासकीय नियमानुसार आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
- वनक्षेत्रपाल सुशांत काळे, शिराळा