२९ शिक्षकांच्या फायली गायब
By admin | Published: June 18, 2015 11:57 PM2015-06-18T23:57:52+5:302015-06-19T00:26:13+5:30
चौकशीत स्पष्ट : लोंढेंकडून शिक्षक नियुक्ती
सांगली : प्रभारी शिक्षणाधिकारी डी. सी. लोंढे नियुक्त शिक्षकांमधील २९ शिक्षकांच्या फायलीच गायब असून, या फायली शोधण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत १४८ शिक्षकांची सुनावणी पूर्ण झाली आहे.
डी. सी. लोंढे नियुक्त शिक्षकांची तपासणी सध्या सुरू आहे. लोंढे यांच्या काळात साडेचारशेहून अधिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी १९० शिक्षकांची नियुक्ती ही नियम व शासन आदेश डावलून करण्यात आल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. त्या सर्व १९० शिक्षकांच्या फायलींची फेरपडताळणी करणे तसेच संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक व संस्थाचालक यांची बाजू ऐकून घेणे यासाठी या सर्व फायली जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडे दाखल झाल्या आहेत. मात्र यापैकी २९ फायली सापडतच नसल्याची चर्चा काल माध्यमिक शिक्षण विभागात सुरू होती. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता, काहीही माहिती देण्यास असमर्थता दर्शवली. मात्र या फायलींचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियम व शासन आदेश डावलून नियुक्त करण्यात आलेल्या १९० शिक्षकांची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. रोज १५ ते २० शिक्षक याप्रमाणे ही सुनावणी सुरू आहे. आतापर्यंत सुमारे दीडशे शिक्षकांची सुनावणी पूर्ण झाली आहे. (प्रतिनिधी)