सांगलीत पहिल्याच दिवशी २९०० महिलांचा अर्ध्या तिकिटात फुल्ल प्रवास, बसस्थानकात महिलांची मोठी गर्दी 

By संतोष भिसे | Published: March 18, 2023 04:57 PM2023-03-18T16:57:46+5:302023-03-18T16:58:27+5:30

कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या महिलाही हुशारी दाखवत योजनेचा फायदा घेऊ लागल्या

2900 women in Sangli full travel in half ticket, A large crowd of women at the bus station | सांगलीत पहिल्याच दिवशी २९०० महिलांचा अर्ध्या तिकिटात फुल्ल प्रवास, बसस्थानकात महिलांची मोठी गर्दी 

सांगलीत पहिल्याच दिवशी २९०० महिलांचा अर्ध्या तिकिटात फुल्ल प्रवास, बसस्थानकात महिलांची मोठी गर्दी 

googlenewsNext

सांगली : महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलतीच्या पहिल्याच दिवशी सांगली आगारातून २९०३ महिलांनी प्रवास केला आहे. अर्ध्या तिकिटात प्रवासाचा फायदा मिळवताना बसस्थानके महिला प्रवाशांनी भरुन गेल्याचे दिसत आहे. 

सांगलीत स्थानकात शनिवारी दुपारी महिलांची मोठी गर्दी होती. शिवाय प्रत्येक बसमध्ये महिला मोठ्या संख्येने होत्या. कोल्हापूर - सांगली - जत या एसटीमध्ये निम्म्यापेक्षा जास्त संख्येने महिलाच दिसून आल्या. शुक्रवारी महामंडळाने अर्ध्या तिकिटात प्रवासाची योजना अंमलात आणली, पण महिलांना त्याची पुरेशी माहिती नव्हती. तरीही रात्री बारा वाजेपर्यंत तब्बल २ हजार ९०३ महिलांनी सांगली स्थानकातून विविध मार्गांवर अर्ध्या तिकिटात प्रवास केला. अनेक महिलांना वाहकाने निम्मे पैसे घेतल्यावरच योजना सुरु झाल्याची माहिती मिळाली.

सांगलीतून जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, विटा, शिराळा या गावांना एसटीचे तिकीट जास्त आहे, पण सवलतीमुळे महिलांनी पैसे वाचल्याचा आनंद व्यक्त केला. विशेषत: सांगली, मिरजेला वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या महिलांना याचा मोठा फायदा झाला आहे.

कर्नाटकी महिलांची चालाखी

कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या महिलाही हुशारी दाखवत योजनेचा फायदा घेऊ लागल्या आहेत. कर्नाटकातून येताना महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटीमध्ये बसायचे. सीमेपर्यंत फुल्ल तिकीट काढायचे, आणि महाराष्ट्र हद्दीत आल्यावर मात्र वाहकाकडून सवलतीचे अर्धे तिकीट घ्यायचे अशी आयडियाची कल्पना त्यांनी लढवल्याचे वाहकांनी सांगितले. यामुळे कर्नाटकातूनही महाराष्ट्राच्या गाड्यांना प्रवासी मिळू लागले आहेत.

पासधारकांना तूर्त लाभ नाही

अनेक नोकरदार महिला महिन्याकाठी पास काढून प्रवास करतात. सध्या अर्ध्या तिकिटाची सवलत सुरु झाली असली, तरी पासधारक महिलांना लगेच त्याचा फायदा मिळणार नाही. पासची मुदत संपल्यानंतर, नवा पास काढतेवेळीच लाभ मिळणार आहे.

Web Title: 2900 women in Sangli full travel in half ticket, A large crowd of women at the bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.