सांगलीत तरूणाच्या खूनप्रकरणी तिघेजण अटकेत; एलसीबीची कारवाई
By शरद जाधव | Published: November 9, 2023 08:07 PM2023-11-09T20:07:23+5:302023-11-09T20:07:57+5:30
अन्य संशयितांचा शोध सुरू
शरद जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : शहरातील गोकूळनगर परिसरात तरूणाचा खून प्रकरणातील तिघा संशयितांना जेरबंद करण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. कृष्णा उर्फ मुदक्या कुटण्णाप्पा कांबळे (वय २१, रा. दसरा चौक, उत्तर शिवाजीनगर,सांगली), राकेश शामराव कांबळे (२६, स्वास्तिक कट्ट्याजवळ, न्यू टिंबर एरिया, सांगली) आणि नारायण सुरेश पवार (२९, रा. माकडवाले गल्ली, उत्तर शिवाजीनगर, सांगली) अशी संशयितांची नावे आहे.
मंगळवारी रात्रीच्या सुमारास विनोद किसन इंगळे (२८, रा. संजयनगर झोपडपट्टी, सांगली) याच्यावर वार करून त्याचा खून करण्यात आला होता. गोकूळनगरमध्ये संशयितांनी कोयता व चाकूने भोसकून खून करण्यात आल्यानंतर विश्रामबाग पोलिसांसह एलसीबीचे पथक गस्तीवर होते. यावेळी पथकाला माहिती मिळाली की, तिघे संशयित संजयनगर येथील तात्यासाहेब मळा येथे लपून बसले आहेत. त्यानुसार पथकाने निगराणी केली असता, तिघेही संशयास्पदरित्या अस्तित्व लपवून थांबले होते. पथकाने तिघांना पळूनही जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले. पूर्ववैमनस्यातून व अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे.
एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, अमर नरळे, विक्रम खोत आदींच्या पथकाने ह कारवाई केली.