Sangli: शेअर मार्केट कंपनीकडून तीन कोटींची फसवणूक, जत तालुक्यातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 01:37 PM2023-12-02T13:37:27+5:302023-12-02T13:38:02+5:30
पाच जणांवर गुन्हा दाखल
जत : श्री हाय टेक ट्रेडर्स या कंपनीच्या माध्यमातून दीडपट परतावा देण्याचे आमिष दाखवून तिघांची तीन कोटी ४४ हजार ४९५ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखाच्या माध्यमातून चौकशी करून शुक्रवारी, दि. १ डिसेंबर रोजी जत पोलिस ठाण्यात पाचविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सोमनाथ रानगट्टी (रा. जत) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विजयकुमार एम. बिरजगी (वय ३९, रा. मॅगोनेस्ट सोसायटी ए- २०८ सिंहगड रोड पुणे), आनंद बसाप्पा बसरगी (वय ४५, रा. डायरी, गांव धाराशिव मंदिर जवळ, नेर पुणे), बापुराय रामगोंडा बिरादार (४२, रा. भिवरगी फाटा संख, ता. जत), शोभा बापुराय बिरादार (३४, रा. भिवर्गी, ता. जत) व अनिता विजयकुमार बिराजदार (३२, रा. मॅगोनेस्ट सोसायटी, सिंहगड रोड पुणे), अशा पाच जणांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
श्री हाय टेक ट्रेडर्स कंपनीचे प्रोप्रा. विजयकुमार बिरजगी याने फिर्यादी सोमनाथ रानगट्टी यांच्या बँक खात्यावरून एक ८८ लाख दोन हजार ४९५ रुपये, प्रदीप पुजारी यांची ३६ लाख ८० हजार व महांतेश आडव्याप्पा डोणुर यांची ७५ लाख ६२ हजार रुपये रकमेस अशी तीन कोटी ४४ हजार ४९५ रुपये श्री हाय टेक ट्रेडर्स कंपनीमध्ये रक्कम गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त रक्कम परतावा देणेची खात्रीशीर हमी देऊन व आमिष दाखविले व त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. शिवाय, फिर्यादी व सहकाऱ्यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन त्यांचे बँक खाते पैसे भरले.
दरम्यान, काही कालावधीनंतर कंपनीकडून आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सांगली पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांची भेट घेत हा प्रकार सांगितला. त्यांनी ही केस सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे दिली. यावर विभागाने याची चौकशी करून आज जत पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.