सांगली-पेठ रस्त्याचा ५४३ कोटींचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 01:34 PM2019-09-28T13:34:05+5:302019-09-28T13:35:03+5:30
खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे, अशी गेली कित्येक वर्षे स्थिती असलेल्या सांगली-पेठ या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी तब्बल ५४३ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
सांगली : खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे, अशी गेली कित्येक वर्षे स्थिती असलेल्या सांगली-पेठ या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी तब्बल ५४३ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. संपूर्ण काँक्रिटीकरण व दुभाजकाचा आराखड्यात समावेश आहे. या रस्त्याच्या निधीसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करावी लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू असून अर्थसंकल्पात समाविष्ट झाल्यानंतरच रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे.
वाहनांची गर्दी, अपघातांचे वाढते प्रमाण, खड्ड्यांचे साम्राज्य यामुळे सांगली-पेठ रस्ता नेहमीच चर्चेत राहिला आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दोन वर्षापूर्वी सांगलीपासून पेठपर्यंतच्या नागरिकांनी कृती समिती स्थापन केली होती.
२०१७ च्या दिवाळीच्या पहिल्यादिवशी या रस्त्यावरील खड्ड्यांत दिवे लावून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला होता. या रस्त्यावर आजअखेर कोट्यवधी रुपये खर्च झाले. पण रस्ता कधीच वर्षभरही टिकला नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेकदा पॅचवर्क केले, पण महिन्याभरात उखडले गेले. सांगली ते तुंगपर्यंतचा रस्ता तर मृत्यूचा सापळा बनला होता. सामाजिक संघटना, कृती समितीने वारंवार आंदोलने केल्यानंतर डिग्रज ते तुंगपर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. पण सांगलीवाडी टोलनाका ते डिग्रजपर्यंतचा रस्ता आजही खराब आहे.
तुंगपासून आष्ट्यापर्यंतच्या रस्त्याचे कामही पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी रस्ता चौपदरीकरण, तर काही ठिकाणी तीनपदरी रस्ता आहे. पेठ ते इस्लामपूरपर्यंतचा रस्ताही अरुंद आहे. या रस्त्यावर पुणे-मुंबईकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असते.
अखेर रस्त्याच्या आंदोलनाला यश येत दोन वर्षापूर्वी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर रस्त्याच्या चौपदरीकरणाची चर्चा सुरू झाली. राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही त्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू केला. अखेर केंद्र शासनाच्या रस्ते विकास मंत्रालयाने या रस्त्याच्या चौपदरीकरणाची घोषणा केली.
काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याच्या चौपदरीकरणाचा आराखडा तयार केला. तब्बल ५४३ कोटींचा हा आराखडा केंद्र शासनाला सादर केला आहे. पेठपासून सांगलीवाडीपर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. हा संपूर्ण रस्ता काँक्रिटचा असेल. हा रस्ता काळ्या मातीतून जात असल्याने काँक्रिटीकरणाशिवाय पर्याय नव्हता.