सातारा, मिरजदरम्यान ३ रेल्वे रद्द, प्रवाशांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 11:56 AM2024-10-09T11:56:21+5:302024-10-09T11:56:57+5:30
मिरज : सातारा जिल्ह्यात शिरवडे-कराड-शेणोली विभागात रेल्वे दुहेरीकरणाच्या कामासाठी सोमवार व मंगळवारी तीन रेल्वेगाड्या सातारा व मिरजदरम्यान रद्द करण्यात ...
मिरज : सातारा जिल्ह्यात शिरवडे-कराड-शेणोली विभागात रेल्वे दुहेरीकरणाच्या कामासाठी सोमवार व मंगळवारी तीन रेल्वेगाड्या सातारा व मिरजदरम्यान रद्द करण्यात आल्या. यामुळे सातारा व मिरज जादा एसटी सोडून रेल्वे प्रवाशांना सातारा व मिरज येथे पोहोचविण्यात आले.
सातारा व मिरजेत रेल्वेत बसण्यासाठी प्रवाशांचे हाल झाले. कराड जवळ रेल्वे दुहेरीकरणासाठी दि.७ रोजी जोधपूर एक्स्प्रेस मिरज-कुर्डुवाडी- दौंड-पुणे-लोणावळा मार्गे वळवली. यामुळे सातारा येथील प्रवाशांना एसटीने मिरजेला यावे लागले. ८ रोजी मिरजेतून सुटणारी रेल्वे क्रमांक २०४७६ मिरज-बिकानेर एक्स्प्रेस मिरज ते सातारा दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली. ही एक्स्प्रेस मिरजेऐवजी सातारा येथून सोडली. यामुळे या गाडीचे अगोदर आरक्षण केलेल्या प्रवाशांना एसटीने साताऱ्याला जावे लागले.
कराड जवळ रेल्वे दुहेरीकरणासाठी ८ रोजी सातारा येथून सुटणारी रेल्वे क्र. ११०२८ सातारा-दादर एक्स्प्रेस सातारा व सांगली दरम्यान अंशतः रद्द केली. सांगलीऐवजी सातारा येथून रेल्वे सुटल्याने प्रवाशांना एसटीने सातारा येथे जावे लागले. रेल्वे प्रशासनाने गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला. मंगळवारी मिरज, सांगलीला जाणाऱ्या बिकानेर - मिरज एक्स्प्रेस गाडीतील प्रवाशांना सातारा एसटी विभागाने एसटी उपलब्ध करून, सातारा रेल्वे स्टेशन येथून एसटीने सांगली, मिरजेला पाठवले.