सोयाबीनच्या दरात महिन्यात ३० टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:24 AM2021-08-01T04:24:20+5:302021-08-01T04:24:20+5:30

सांगली : सोयाबीनच्या दरात गेल्या महिन्याभरात तब्बल ३० टक्के वाढ झाली आहे. महिन्यापूर्वी सांगलीच्या मार्केट यार्डमध्ये ७ हजार २०० ...

30 per cent increase in soybean prices per month | सोयाबीनच्या दरात महिन्यात ३० टक्के वाढ

सोयाबीनच्या दरात महिन्यात ३० टक्के वाढ

Next

सांगली : सोयाबीनच्या दरात गेल्या महिन्याभरात तब्बल ३० टक्के वाढ झाली आहे. महिन्यापूर्वी सांगलीच्या मार्केट यार्डमध्ये ७ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल असणाऱ्या सोयाबीनच्या दराने आता ९ हजार ३००चा आकडा पार केला आहे. दरातील ही विक्रमी वाढ मानली जात आहे.

राज्यात सर्वत्र सोयाबीनला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सांगलीच्या मार्केट यार्डमध्ये एप्रिल ते जुलै याकाळात १ हजार ६५० क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. सध्या आवक पूर्णपणे थांबली आहे. राज्याच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी ८० टक्के उत्पादन हे विदर्भात होते. त्याठिकाणीही सोयाबीनला चांगला दर मिळत आहे. वाशिम येथे क्विंटलचा दर सध्या ९ हजार ७०० रुपये आहे. सांगलीत तुलनेते थोडा कमी दर असला तरी एकूण दरवाढ विक्रमी आहे.

बाजारातील किलोचा दर आता शंभरीकडे चालला आहे. त्यामुळे उत्पादकांच्या दृष्टीने ही समाधानाची बाब मानली जात आहे. हंगाम संपल्यानंतर शेतकऱ्यांनी ज्या दराने सोयाबीनची विक्री केली त्या दरात आणि आताच्या दरात फार मोठा फरक आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांमध्ये याबाबत नाराजीही आहे. अल्पभूधारक शेतकरी शेतमाल तयार झाला की बाजार समितीत विक्रीसाठी आणतो. याचवेळी मोठे उत्पादक भाववाढीच्या अपेक्षेने पाच ते सहा महिने सोयाबीनची विक्री थांबवू शकतात. हंगाम संपल्यानंतर दरवर्षी सात ते आठ महिन्यांनी दरवाढ होत असल्याचा उत्पादकांना अनुभव येत आहे.

चौकट

जिल्ह्यात सोयाबीनचे मोठे नुकसान

महापुरामुळे प्राथमिक अंदाजानुसार, जिल्ह्यातील ७ हजार ९० हेक्टरवरील सोयाबीन पिकाला फटका बसला आहे. सोयाबीनला भाव मिळत असल्याने ज्या शेतकऱ्यांनी जिल्ह्यात सोयाबीन उत्पादन घेतले, त्यांच्या पदरी निराशा आली आहे.

कोट

सोयाबीनला भाव मिळणे ही चांगली गोष्ट आहे. बाजारातील दरवाढ उत्पादकालाही फायदा मिळवून देत असते, मात्र जिल्ह्यातील सोयाबीन व अन्य पिकांचे जिल्ह्यात नुकसान झाले आहे, त्यांना योग्य भरपाई शासनाने द्यावी.

- महेश खराडे, प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

चौकट

सांगली मार्केट यार्डातील सोयाबीन दर प्रतिक्विंटल

तारीख किमान कमाल

१ जुलै ६७०० ७२००

५ जुलै ७५०० ७६००

९ जुलै ७५०० ७८००

१९ जुलै ७२०० ७८००

२९ जुलै ९००० ९३००

Web Title: 30 per cent increase in soybean prices per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.