राजारामबापू कारखान्याकडून ३0 कोटींचा अपहार : गौतम पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 03:08 PM2019-06-28T15:08:54+5:302019-06-28T15:09:56+5:30
राजारामबापू पाटील कारखान्याने सर्वोदय कारखान्याच्या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रे, लेटरहेड, शिक्के आणि बनावट सह्या करुन सर्वोदयच्या नावाने पेट्रोलियम पदार्थांची खरेदी, तर राजारामबापू कारखान्याच्या नावाने विक्री करून २५ ते ३0 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप माजी नगरसेवक गौतम पवार यांनी केला. ही फसवणूक आणि अपहाराबद्दल येत्या चार दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास आष्टा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
इस्लामपूर : राजारामबापू पाटील कारखान्याने सर्वोदय कारखान्याच्या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रे, लेटरहेड, शिक्के आणि बनावट सह्या करुन सर्वोदयच्या नावाने पेट्रोलियम पदार्थांची खरेदी, तर राजारामबापू कारखान्याच्या नावाने विक्री करून २५ ते ३0 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप माजी नगरसेवक गौतम पवार यांनी केला. ही फसवणूक आणि अपहाराबद्दल येत्या चार दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास आष्टा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
येथील भाजपच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार बैठकीत पवार बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष व जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष निशिकांत पाटील, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
पवार म्हणाले, सर्वोदय कारखान्याच्या पेट्रोल पंपावरील अपहारप्रकरणी राजारामबापू कारखान्याच्या सर्व संचालकांसह कार्यकारी संचालक आणि सरव्यवस्थापक जबाबदार आहेत. या सर्वांनी संगनमत करुन २५ ते ३0 कोटी रुपयांचा अपहार केला आहे. पेट्रोलियम पदार्थांची व उपपदार्थांची खरेदी सर्वोदय कारखाना करत असल्याचे भासवून इंडियन आॅईल कॉर्पोरेशनचीही फसवणूक केली आहे. याबाबत आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिला आहे.
ते म्हणाले, आमदार जयंत पाटील यांनी भावनिक होऊन आमच्या कारखान्याशी करार केला होता. त्यानंतर काही काळातच करारातील नियमावली पाळली नाही. कराराप्रमाणे देय असणारी रक्कम देण्याची तयारी होती. मात्र त्यांनी टाळाटाळ केली. पुढे जबरदस्तीने कायद्याचे व कराराचे उल्लंघन करुन कारखान्यासह संबंधित संस्थाही ताब्यात घेतल्या. उच्च न्यायालयाने, सर्वोदयप्रकरणी महाराष्ट्र शासनाने निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले.
त्यानुसार शासनाने हा कारखाना कायदेशीररित्या आमच्या ताब्यात देण्यासाठी प्रक्रिया सुरु केली. मात्र या प्रक्रियेला स्थगिती मळविण्यासाठी राजारामबापूच्या व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तेथेही त्यांचे वकील वेगवेगळी कारणे सांगून गैरहजर राहत आहेत. या हंगामात कारखाना सुरू होेऊ नये, असा त्यांचा प्रयत्न आहे. ऊस उत्पादक व कामगारांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत हा हंगाम आम्ही सुरु करणार आहोत.