मिरजेत ३० तास डॉल्बीमुक्त मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:14 AM2017-09-07T00:14:11+5:302017-09-07T00:14:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरजेत १९० मंडळांच्या गणेशाचे सवाद्य मिरवणुकीने अनंतचतुर्दशीदिवशी ‘बाप्पा मोरयाऽऽ’च्या गजरात विसर्जन झाले. ३० तास सुरू असलेल्या या विसर्जन सोहळ्याचा बुधवारी दुपारी दोन वाजता पोलिस व बसवेश्वर मंडळाच्या गणेश विसर्जनाने समारोप झाला. डॉल्बीशिवाय पारंपरिक वाद्यांचा वापर करीत ही विसर्जन मिरवणूक पार पडली.
मंगळवारी सकाळी नऊ वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. येथील शिवाजी गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत पालखी बैलगाडी, घोडे, टाळ-मृदंगासह वारकरी, पारंपरिक वेशातील तरूण सहभागी होते. शिवाजी मंडळाच्या गणेशमूर्तीचे दुपारी १२ वाजता गणेश तलावात विसर्जन झाले.
दुपारपर्यंत शहराच्या विविध भागातून सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका विसर्जन मार्गावर आल्या. सायंकाळी पोलिस ठाणे ते गणेश तलाव मार्गावर मोठी गर्दी झाली होती. बॅन्ड, बेन्जो, झांजपथक, लेझीम, टाळ-मृदंग, धनगरी ढोल, ढोल-ताशा आदी पारंपरिक वाद्यांच्या गजरात तरुणांचे नृत्य सुरु होते. रात्री बारापर्यंत मिरवणूक मार्ग व मार्केट चौक गर्दीने फुलला होता. ग्रामीण भागातील नागरिकांची मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी होती.
रात्री बारा वाजता वाद्ये बंद झाल्यानंतर गर्दी कमी होऊन मिरवणूक गतीने पुढे सरकली. पहाटे पाच वाजता गणेश तलावात १३५ मंडळांच्या गणेशाचे विसर्जन पूर्ण झाले. मात्र त्यानंतर कृष्णा नदीत मोठ्या व उंच गणेशमूर्तींचे क्रेनने विसर्जन करण्यास विलंब झाल्याने विसर्जनाचा समारोप दुपारी दोनपर्यंत लांबला.
बुधवारी दुपारी दोन वाजता हजारो नागरिकांच्या उपस्थितीत न्यू ओंकार, गणाध्यक्ष, संत रोहिदास, भगवा राजा, बसवेश्वर व पोलिस दलाच्या उंच गणेशमूर्तींचे क्रेनने नदीत विसर्जन करण्यात आले. महापालिकेने गणेश तलाव व कृष्णा घाटावर विसर्जनासाठी दोन क्रेन व तराफ्यांची व्यवस्था केली होती. गणेश तलावात १५०, तर कृष्णा नदीत ४० सार्वजनिक मंडळांच्या गणेशाचे विसर्जन पार पडले.
मिरवणूक लांबली : पोलिसांवर ताण
पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे, उपअधीक्षक धीरज पाटील, बाजीराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पोलिस फौजफाटा विसर्जन बंदोबस्तासाठी मिरजेत उपस्थित होता. मंगळवारी सकाळपासून विसर्जन मिरवणूक सुरु असल्याने पोलिस यंत्रणेवर मोठा ताण पडला होता. सुमारे ३० सीसीटीव्ही कॅमेºयांद्वारे पोलिस मिरवणुकीवर नजर ठेवून होते.
ध्वनिमापन पथके
मिरवणुकीत पोलिसांची ध्वनिमापन पथके कार्यरत होती. डॉल्बीस प्रतिबंधासाठी पोलिसांनी कठोर पवित्रा घेतल्याने डॉल्बीशिवाय विसर्जन मिरवणूक पार पडली. कृष्णा घाटावर विसर्जनासाठी गेलेल्या मंडळांनी बुधवारी सकाळी सहानंतर विसर्जन होईपर्यंत पुन्हा वाद्ये सुरू केली होती.
मुस्लिम कार्यकर्त्यांकडून स्वागत
दर्गा चौकात असगर शरीकमसलत, जैलाब शेख, मुजीब मुतवल्ली, शहानवाज मुल्ला यांसह मुस्लिम कार्यकर्त्यांनी मिरवणुकीचे स्वागत केले. हिरा हॉटेल चौकात गणेश माळी मित्र मंडळ, मिरज सुधार समिती, रेल्वे प्रवासी सेनेचे गणेश माळी, बाबासाहेब आळतेकर, गणेश तोडकर, धनराज सातपुते, मुस्तफा बुजरूक, जहीर मुजावर, राकेश कोळेकर, ए. ए. काझी आदी कार्यकर्त्यांनी अल्पोपहार व पाणी वाटप केले.