सांगलीत पोलिसाच्या कुटुंबाला ३० लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 06:41 PM2020-11-30T18:41:28+5:302020-11-30T18:45:14+5:30
police, funds, accident, sangli कासेगाव पोलीस ठाण्याकडील हवालदार वजीर ईलाही मुजावर (रा. मिरज) यांचा अज्ञात वाहनाने ठोकरल्याने वर्षभरापूर्वी मृत्यू झाला होता. मुजावर यांच्या कुटुंबियांना अपघाती विम्यातून ३० लाखांची मदत करण्यात आली. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याहस्ते कुटुंबाला धनादेश सुपूर्द करण्यात आला.
सांगली : कासेगाव पोलीस ठाण्याकडील हवालदार वजीर ईलाही मुजावर (रा. मिरज) यांचा अज्ञात वाहनाने ठोकरल्याने वर्षभरापूर्वी मृत्यू झाला होता. मुजावर यांच्या कुटुंबियांना अपघाती विम्यातून ३० लाखांची मदत करण्यात आली. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याहस्ते कुटुंबाला धनादेश सुपूर्द करण्यात आला.
पोलीस हवालदार वजीर ईलाही मुजावर यांनी विश्रामबाग, सांगली शहर, वाहतूक शाखा, जिल्हा न्यायालय, तासगाव, कासेगाव या ठिकाणी सेवा बजावली होती. ते कासेगाव पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. ३१ डिसेंबर २०१९ रोजी ते घरी धार्मिक कार्यक्रमासाठी कळंबी (ता. मिरज) येथे गेले होते.
कार्यक्रम संपल्यानंतर ते मोटारसायकलीने पंढरपूर रोडने मिरजेकडे येत असताना त्यांची दुचाकी खड्ड्यात गेली. याचवेळी मागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना ठोकरल्याने ते जखमी झाले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या पोलीस कुटुंबाला अपघात विमा मिळावा, यासाठी अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी ॲक्सीस बँकेचे शाखाधिकारी अनंत चौधरी यांच्याशी संपर्क साधून पाठपुरावा केला. मंगळवारी मृत हवालदाराच्या नातेवाईकांना ३० लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.