सांगलीत ३० लाखांच्या जुन्या नोटा जप्त

By admin | Published: January 17, 2017 12:10 AM2017-01-17T00:10:04+5:302017-01-17T00:10:04+5:30

मोटारीचा थरारक पाठलाग : कऱ्हाड, पुण्यातील दोन व्यापारी पोलिसांच्या ताब्यात

30 lakh old notes in Sangli seized | सांगलीत ३० लाखांच्या जुन्या नोटा जप्त

सांगलीत ३० लाखांच्या जुन्या नोटा जप्त

Next



सांगली : केंद्र शासनाने दोन महिन्यांपूर्वी बंद केलेल्या हजार व पाचशेच्या सुमारे ३० लाखांच्या जुन्या नोटा संजयनगर पोलिसांनी सोमवारी रात्री नऊ वाजता जप्त केल्या. माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा औद्योगिक वसाहतीमध्ये एका मोटारीचा पाठलाग करुन ही कारवाई करण्यात आली. मोटारीतील दोन व्यापाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
कुमार संगवी (कऱ्हाड, जि. सातारा) व किशोर लुनिया (कोंडवा, पुणे) अशी ताब्यात घेतलेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. संगवी हा कपडे व्यापारी, तर लुनिया हा सराफ व्यावसायिक आहे. त्यांच्या ताब्यातील मोटार (एमएच ११ एडब्ल्यू ३७८४) ही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी चोरी व घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार संजयनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांचे पथक सोमवारी रात्री वसंतदादा औद्योगिक वसाहतीमध्ये गस्त घालत होते. त्यावेळी मोटार (क्र. एमएच ११, एडब्ल्यू ३७८४) ही संशयास्पदरीत्या जात असताना आढळून आली. पथकाने मोटारीला थांबण्याचा इशारा केला. पण मोटारचालक थांबला नाही. पाठलाग करुन ही मोटार थांबविण्यात आली. मोटारीची झडती घेतल्यानंतर मोटारीत एक बॅग आढळून आली.
या बॅगेत दोन महिन्यांपूर्वी केंद्र शासनाने बंदी घातलेल्या हजार व पाचशेच्या नोटा आढळून आल्या. मोटारीतील कुमार संगवी व किशोर लुनिया यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणून त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी, ३० लाखांची ही रोकड असून ती व्यवसायातील आहे, असे सांगितले आहे. नोटांची मोजदाद करण्यासाठी पोलिसांनी यंत्र उपलब्ध केले आहे. मध्यरात्रीपर्यंत नोटांची मोजदाद सुरु होती. ३० लाखापेक्षा जादा रोकड असावी. पण मोजदाद झाल्याशिवाय निश्चित आकडा सांगता येणार नाही, असे निरीक्षक जाधव यांनी सांगितले.
नोटांबाबत खुलासा करण्याची सूचना केली आहे, मात्र अजूनही त्यांनी योग्य खुलासा व पुरावे सादर केलेले नाहीत. मंगळवारी या कारवाईची माहिती आयकर विभागाला देण्यात येईल, त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असेही जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
शिक्षेची तरतूद : ३१ मार्चनंतर जुन्या पाचशे व एक हजार रुपयांच्या दहापेक्षा जास्त नोटा जवळ बाळगल्या, तर पन्नास हजार रुपयांपर्यंतचा दंड व चार वर्षांपर्यंत सक्तमजुरीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
कोटीचा आकडा ओलांडला
केंद्र शासनाने ८ नोव्हेंबर २०१६ला हजार, पाचशेच्या नोटांवर बंदी घातली आहे. या नोटा बँकेत जमा करण्यास शासनाने ५० दिवसांची मुदत दिली होती. तेव्हापासून ते आजअखेर सांगली पोलिसांनी जिल्ह्यात अंदाजे एक कोटीपेक्षा जादा रोकड जप्त केली आहे. सांगली, तासगाव, विटा, इस्लामपूर येथे नोटा जप्तची कारवाई झाली आहे. या कारवाईची माहिती आयकर विभागाला दिली आहे. आयकरकडून याची चौकशी सुरु आहे.

Web Title: 30 lakh old notes in Sangli seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.