वाळवा तालुक्यात आठ दिवसांत ३० रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:30 AM2021-03-09T04:30:00+5:302021-03-09T04:30:00+5:30
इस्लामपूर : इस्लामपूर शहरासह वाळवा तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. आठ दिवसांत तालुक्यात नव्या ...
इस्लामपूर : इस्लामपूर शहरासह वाळवा तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. आठ दिवसांत तालुक्यात नव्या ३० रुग्णांची नोंद झाली आहे. इस्लामपूर शहरात सर्वाधिक १२, तर ग्रामीण परिसरात १८ रुग्ण आहेत. शहराच्या महादेवनगरमधील भोसले कॉलनीतील एकाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला.
गेल्या वर्षीच्या २३ ते २९ मार्च दरम्यान कोरोनाचे तब्बल ३० रुग्ण सापडल्याने इस्लामपूर शहर देशाच्या नकाशावर झळकले. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तर कोरोनाने हाहाकार माजविला होता. त्यावेळी लॉकडाऊनसह संचारबंदीसारख्या उपाययोजना कठोरपणे राबविण्यात आल्या. पर्यायाने संपर्क साखळी तोडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले.
आता गेल्या आठ दिवसांत कोरोना संसर्गाने डोके वर काढले आहे. नवीन रुग्ण घरीच विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. इस्लामपूर-१२, नेर्ले-७, गोटखिंडी-४, मसुचीवाडी-३ आणि वाळवा, बहे, आष्टा, महादेववाडी या गावात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.