महाडिक मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना ३० टक्के वेतनवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:30 AM2021-09-23T04:30:39+5:302021-09-23T04:30:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कोरोना काळात तीन महिने लॉकडाऊन असतानाही, ग्राहकांना विनम्र आणि तत्पर सेवा देणाऱ्या येथील वनश्री ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कोरोना काळात तीन महिने लॉकडाऊन असतानाही, ग्राहकांना विनम्र आणि तत्पर सेवा देणाऱ्या येथील वनश्री नानासाहेब महाडिक मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना संस्थापक आणि भाजपच्या युवामोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक यांनी ३० टक्के वेतनवाढ देण्याची घोषणा केली. दातृत्व, वात्सल्य आणि धाडस या तिन्ही गोष्टींचा संगम असणाऱ्या नानासाहेब महाडिक यांचा वारसा जोपासणारी कृतिशीलता या निर्णयातून अधोरेखीत झाली.
कोरोना महामारीच्या काळात अनेक व्यवसाय, उद्योगधंदे बंद पडले. बेरोजगारी वाढली. काहींना आपल्या नोकऱ्या सोडाव्या लागल्या, तर काहींना ५० टक्के वेतनावर काम करावे लागले. आर्थिक मंदीचा फटका बसत असतानाच्या काळात महाडिक मल्टिस्टेटचे संस्थापक राहुल महाडिक यांनी १९ शाखेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या भरीव वेतनवाढीची अनोखी भेट दिली आहे.
गेल्या ९ वर्षांपूर्वी या संस्थेची स्थापना झाली आहे. सांगली आणि कोल्हापूूर जिल्ह्यात संस्थेच्या १९ शाखा असून, ग्राहकांना प्रामाणिकपणे सर्वोत्कृष्ट सेवा दिली जाते. या संस्थेत सध्या ऑनलाईन बँकिंग व्यवहार सुरू आहेत. कोरोनाच्या काळात ग्राहकांना याचा चांगला उपयोग झाला. क्युआर कोडमुळे खातेदारांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होत. कर्जफेड आणि बचत असे दुहेरी व्यवहार होत आहेत. मोबाइल बँकिंग ॲपमुळे ग्राहकांकडून घरबसल्या आर्थिक व्यवहार होत आहेत.
सामाजिक सेवेच्या उद्देशाने स्थापन झालेल्या या संस्थेने प्रगतीचे अनेक टप्पे ओलांडले आहेत. कोरोना काळात कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता, संस्थेसाठी प्रामाणिकपणे निरंतर काम केले आहे. भविष्यात कर्मचाऱ्यांनी अधिक उत्साहाने सेवा देऊन संस्थेच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे. या भावनेतून राहुल महाडिक यांनी कर्मचाऱ्यांना ही वेतनवाढ दिली आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश महाडिक, कार्यकारी संचालक आर.एम. बागडी उपस्थित होते.