सांगली जिल्हा बँकेकडून साखर कारखान्यांना ३०८ कोटींचे कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 04:24 PM2022-11-19T16:24:54+5:302022-11-19T16:25:32+5:30
शेती कर्जामध्ये मध्यम व दीर्घ मुदत द्राक्षबागासाठी ३८६ सभासदांना आठ कोटी १९ लाख रुपये मंजूर
सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत ३४६.०८ कोटीच्या अल्प व मध्यम मुदत कर्जास मंजुरी देण्यात आली. यामध्ये विश्वासराव नाईक, दत्त इंडिया, कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती, दूधगंगा- वेदगंगा या चार साखर कारखान्यांना ३०८ कोटी रुपयांच्या कर्जाचा समावेश आहे. बँक अध्यक्ष तथा आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
कर्ज समितीच्या बैठकीत बिगर शेती कर्जे २८ कोटी २९ लाखाची मंजूर केली आहेत. यामध्ये १०३ बचतगटासाठी एक कोटी ५० लाख, मध्यम मुदत वाहन कर्जासाठी एक कोटी २३ लाख, पगारदारांच्या ४१ नोकरांच्या संस्थांसाठी दोन कोटी २८ लाख, बॅंक सेवकांना घरबांधणीसाठी मुदत कर्जासाठी एक कोटी १५ लाख, दीर्घ मुदतीत शेतकऱ्यांना घर बांधणीसाठी पाच कोटी ६७ लाख, मालमत्ता तारणावर दोन कोटी ३२ लाख, थेट कर्जपुरवठा योजनेअंतर्गत संस्थेचे ग्रीन कॅश क्रेडिट चार कोटी असा बिगर शेतीचा एकूण कर्जपुरवठा २८ कोटी २९ लाख रुपयांचा करण्यात आला आहे.
या बैठकीस जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, आमदार अनिल बाबर, प्रकाश जमदाडे, मन्सूर खतीब, राहुल महाडिक, बाळासाहेब व्हनमोरे, सुरेश पाटील, बी.एस. पाटील, वैभव शिंदे, संग्राम देशमुख, महेंद्र लाड, तानाजी पाटील आदी उपस्थित होते.
द्राक्षबागासाठी आठ कोटी १९ लाख
शेती कर्जामध्ये मध्यम व दीर्घ मुदत द्राक्षबागासाठी ३८६ सभासदांना आठ कोटी १९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शेतजमीन खरेदीसाठी ३१ लाख, विकास सोसायटी यांना गाळा बांधकामासाठी २० लाख रुपये, नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत १८ लाख असा नऊ कोटी ७८ लाखाचा कर्जपुरवठा करण्यात आला आहे. साखर कारखान्यांसाठी ३०८ कोटी मंजूर करण्यात आले आहेत.