३१ जुलैनंतर आमच्या वाटा वेगळ्या...
By admin | Published: July 15, 2014 11:59 PM2014-07-15T23:59:21+5:302014-07-15T23:59:43+5:30
अण्णा डांगेंचा इशारा : धनगर समाजाचा सांगलीत मोर्चा; अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी
सांगली : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी आज (मंगळवार) धनगर समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, प्रदेशाध्यक्ष हणमंत पवार यांनी केले. ३१ जुलैपर्यंत राज्य शासनाने आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी अन्यथा आमच्या वाटा वेगळ्या आहेत, असा इशारा यावेळी डांगे यांनी दिला.
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यात यावा, याची शिफारस राज्य शासनाने केंद्र शासनाला करावी, घटनेमध्ये उल्लेख करण्यात आलेला धनगड व धनगर या दोन जाती एकच आहेत, हे स्पष्ट करावे आदी मागण्यांसाठी जिल्हा धनगर समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी डांगे म्हणाले की, हा मोर्चा आमचा असंतोष व्यक्त करण्यासाठी काढण्यात आला आहे. या मोर्चाद्वारे आम्ही इशारा देतो की, राज्य शासनाने ३१ जुलैपर्यंत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. याबाबत भूमिका स्पष्ट करावी अन्यथा १ आॅगस्टपासून आमच्या वाटा वेगळ्या असतील. १९५६ पासून धनगर समाज मागण्यांसाठी संघर्ष करीत आहे. या समाजाला बाजूला ठेवून इतर समाजांना शासनाने आरक्षण दिले आहे. यामुळे हे सरकार सर्वांना बरोबर घेऊन काम करीत नसल्याचे स्पष्ट होते. धनगर समाजाला त्यांच्या अधिकारापासून वंचित रहावे लागत आहे. निर्णय होईपर्यंत आम्ही या मागणीसाठी पाठपुरावा करीत राहू, असे त्यांनी सांगितले.
यावेळी हणमंत पवार, शामराव जाधव आदींनी मार्गदर्शन केले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, या मागणीसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
मोर्चाची सुरुवात राम मंदिर चौकापासून करण्यात आली. मोर्चामध्ये आकाराम मसाळ, सुनील मलगुंडे, किसन गावडे, संभाजी कचरे, वैशाली डांगे, अलका पुजारी, सुवर्णा यमगर, अमर पडळकर, सुनीता पांढरे, सुरेखा कोळेकर आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)