नोकरीचे आमिष दाखवून ३२ लाखांचा गंडा, सांगलीतील आठ तरुणांची फसवणूक
By शीतल पाटील | Published: July 10, 2023 07:21 PM2023-07-10T19:21:32+5:302023-07-10T19:21:52+5:30
नोकरीसाठी बोलावणे न आल्याने फसवणूक झाल्याचे संबंधितांच्या लक्षात आले.
सांगली : पोस्ट विभासाह शासनाच्या विविध विभागात नोकरीचे आमिष दाखवून सांगली जिल्ह्यातील आठ जणांना तब्बल ३२ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. भामट्याने पोस्ट खात्याचे बोगस नियुक्ती पत्रे डिजीटल शिक्का व बनावट स्वाक्षरी करुन संबंधितांना दिली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मालगाव येथील वैभव आण्णासो बंडगर (रा. मालगाव रोड, आवटी पेट्रोलपंप नजीक ता. मिरज ) याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अतुल उर्फ सागर सुरेश ओमासे (रा. पंचशीलनगर, वाडीकर चाळ, जुना बुधगाव रस्ता सांगली) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी ओमासे शहरातील एका खाजगी कंपनीत सुरक्षा रक्षकाचे काम करतात. संशयित वैभव बंडगर याचे कवलापूर येथे अक्षरदीप फाऊंडेशन ट्रस्ट तसेच अक्षरदीप शिक्षण संस्था आहे. या माध्यमातून त्याने वरिष्ठ पातळीवर ओळखी असून काही लाख रुपये दिल्यास विविध शासकीय पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्याच्यावर विश्वास ठेवून आठ जणांनी बंडगर याला वेळोवेळी ३२ लाख रुपये दिले.
हा फसवणूकीचा सर्व प्रकार मार्च २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत विश्रामबाग परिसरात घडला. संशय येवू नये याकरिता बंडगरने पोस्ट विभागात नोकरीची बनावट नियुक्ती पत्रे दिली. त्याच्यावर डिजिटल शिक्का व बनावट स्वाक्षरी केली. पोस्टामधून नोकरीसाठी बोलावणे न आल्याने फसवणूक झाल्याचे संबंधितांच्या लक्षात आले. त्यांनी संशयित बंडगर याच्याकडे पैशाची मागणी केली. त्याने स्वत: तसेच नातेवाईकांकरवी फिर्यादीसह अन्य सातजणांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे सर्वांनी पोलीस ठाण्यात धाव घेत बंडगर विरोधात फिर्याद दाखल केली.