कोयनेतून ३२ हजार क्युसेकने विसर्ग सुरु; कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ होणार
By अशोक डोंबाळे | Published: August 20, 2022 01:33 PM2022-08-20T13:33:54+5:302022-08-20T17:24:59+5:30
कृष्णा नदीची पाणीपातळी सांगली आयर्विन पूल येथे २५ फूटावर जाण्याची शक्यता आहे.
अशोक डोंबाळे
सांगली : कोयना धरण क्षेत्रातून पाण्याची आवक वाढल्याने आज, शनिवारी सकाळी १० वाजता धरणाचे दरवाजे चार फुट सहा इंच उघडून २९ हजार ९०० क्युसेक्स विसर्ग सोडला आहे. धरण पायथा विद्युत गृहामधून दोन हजार १०० क्युसेक्स विसर्ग चालू असलेने कोयना धरणातूननदीपात्रात एकूण ३२ हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी सांगली आयर्विन पूल येथे २५ फूटावर जाण्याची शक्यता आहे.
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप आहे. परंतु, कोयना आणि वारणा धरण क्षेत्रात पाऊस सुरु आहे. म्हणून कोयना धरणातून ३२ हजार क्युसेक्सने कृष्णा नदीत विसर्ग चालू आहे. यामुळे सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी शनिवारी सायंकाळी अथवा रविवारी सकाळपासून वाढण्याची शक्यता आहे. सांगली आयर्विन येथे शनिवारी दुपारी साडेबारा वाजता १७ फूट ३ इंच पाणीपातळी आहे. पण, यामध्ये वाढ होऊन २५ फूटापर्यंत जाण्याचा अंदाज जलसंपदा विभागाकडून वर्तविला आहे.