टेंभूच्या पाण्यासाठी ३२ गावांचा एल्गार - सर्व निवडणुकांत मतदानावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 09:54 PM2019-07-18T21:54:25+5:302019-07-18T22:04:32+5:30
टेंभूचे पाणी पिण्यासाठी व शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना मिळावे, यासाठी आंदोलन करण्यात येत आहे तसेच टेंभू पाणी योजनेचा जोपर्यंत लाभ येथील शेतकºयांना मिळत नाही, तोपर्यंत आगामी विधानसभेसह सर्व निवडणुकांत मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल,
कुकुडवाड (जि. सातारा) : कायम दुष्काळी असणाऱ्या माण-खटावला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. या दुष्काळी परिस्थितीमुळे लोकशाहीच्या मार्गाने टेंभू योजनेच्या पाण्यासाठी शनिवार (दि.२०) कुकुडवाड येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये खटाव तालुक्यातील मायणी-कलेढोण परिसरातील १६ व माण तालुक्यातील कुकुडवाड परिसरातील १६ अशा एकूण ३२ गावांतील शेतकरी व ग्रामस्थ एकत्र येणार आहेत, अशी माहिती टेंभू पाणी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
टेंभूचे पाणी पिण्यासाठी व शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना मिळावे, यासाठी आंदोलन करण्यात येत आहे तसेच टेंभू पाणी योजनेचा जोपर्यंत लाभ येथील शेतकºयांना मिळत नाही, तोपर्यंत आगामी विधानसभेसह सर्व निवडणुकांत मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा ठाम निर्धार कुकुडवाड ग्रामस्थांनी व परिसरातील लोकांनी एकत्र येऊन केला आहे.
पाणी मिळेपर्यंत हा लढा असाच चालू ठेवण्यात येणार असून, ‘आता नाही तर कधीच नाही,’ असा नारा देत पाण्याच्या संघर्षाला सुरुवात जनतेने केली आहे. दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी टेंभू योजनेचे पाणी कलेढोण व कुकुडवाडसह परिसरातील व शेजारील वाड्यांना वरदान ठरणार आहे. वर्षानुवर्षे चालत आलेला पशुपालक, मेंढपाळ, मातीकाम, रंगकाम आदींचा स्थलांतराचा प्रश्न सुटणार आहे. या योजनेमुळे येथील परिसरातील लोकांचा पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाºयाचा प्रश्न सुटणार आहे. शेतकºयाचे कोलमडलेले आर्थिक नियोजन सुरळीत होणार आहे.
पाणी संघर्ष समितेचे आवाहन
टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून कुकुडवाडसह परिसरातील वाड्यांचा पाणी प्रश्न मिटणार आहे म्हणून टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी येथील परिसराला देणे गरजेचे आहे, अशी मागणी टेंभू पाणी योजनेपासून वंचित राहिलेल्या कुकुडवाड, कलेढोण परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे तरी कुकुडवाड येथे होणाºया पाणी परिषदेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कुकुडवाड टेंभू पाणी संघर्ष समितीने केले आहे.