सोयाबीनचे ३३ नमुने अपात्र
By admin | Published: July 16, 2014 11:29 PM2014-07-16T23:29:23+5:302014-07-16T23:38:52+5:30
डी़ एस़ शिंगे : सहा दोषी कंपन्यांवर खटला दाखल होणार
सांगली : कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील २८२ कृषी केंद्रांतून २८२ सोयाबीन आणि भात बियाणांचे नमुने घेतले होते़ यापैकी १४९ बियाणांची तपासणी केली असून, ३३ बियाणे अपात्र ठरले आहेत़ यामध्ये सोयाबीनचे ३२ आणि भात बियाणाच्या एका नमुन्याचा समावेश आहे़ याप्रकरणी सहा कंपन्यांवर खटला दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा गुणनियंत्रक डी़ एस़ शिंगे यांनी दिली़
जिल्हा परिषद आणि राज्य शासनाकडील कृषी विभागाने खरीप हंगामातील बियाणे, खते आणि कीटकनाशकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ११ गुणनियंत्रकांची नियुक्ती केली आहे़ खत कंपन्यांच्या निकृष्ट बियाणांना लगाम घालण्यासाठी गुणनियंत्रकांनी २८२ कृषी सेवा केंद्रांतून २८२ सोयाबीन आणि भाताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले होते़ सोयाबीन बियाणांची उगवणक्षमता ७० टक्केपेक्षा जादा पाहिजे, परंतु सोयाबीन आणि भाताच्या ३३ बियाणे नमुन्याची उगवणक्षमता ५२ टक्केपेक्षा कमी आढळून आली आहे़
यामध्ये कृषीधन ११, ईगल सिडस् आठ, सिध्दा सिडस् पाच, महाबीज चार आणि अंकुर दोन आणि ग्रीन गोल्ड कंपनीचे तीन नमुने आहेत़ या कंपन्यांच्या बियाणांची उगवणक्षमता ५२ टक्केपेक्षा कमी आहे, अशी माहिती शिंगे यांनी दिली़ (प्रतिनिधी)
जगन्नाथ कोळपे यांचे संचालकपद रद्द
उपनिबंधकांची कारवाई : सयाजी पाटील यांच्या तक्रारीवर कारवाई
सांगली : प्राथमिक शिक्षक संघाचे नेते जगन्नाथ कोळपे यांना शिक्षक बँकेच्या संचालकपदासाठी जिल्हा उपनिबंधकांनी अपात्र ठरविले आहे. यासंबंधीचा आदेश आजच बँकेला प्राप्त झाला. कोळपे हे भूविकास बँकेचे थकबाकीदार असतानाही त्यांनी निवडणूक लढविली होती. त्याबाबत शिक्षक समितीचे सरचिटणीस सयाजी पाटील यांनी उपनिबंधकांकडे तक्रार केली होती. त्यांचे संचालकपद रद्द झाल्याने थोरात गटाला मोठा धक्का बसला आहे.
बँकेच्या २००९ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत कोळपे शिक्षक समितीतून निवडून आले होते. त्यानंतर ते बँकेचे अध्यक्षही झाले. दोन वर्षातच त्यांनी समितीला रामराम ठोकत शिक्षक संघाच्या थोरात गटात प्रवेश करीत सवतासुभा मांडला. २००५ पासून कोळपे भूविकास बँकेचे थकबाकीदार आहेत. भूविकास बँकेने वारंवार थकित कर्जाची मागणी करूनही त्यांनी कर्ज भरलेले नाही. सहकार कलम ७३ (सी) ए नुसार कोणत्याही सहकारी संस्थेचे थकबाकीदार असल्यास कायदेशीररित्या अन्य संस्थेवर संचालक पदासाठी अर्ज भरता येत नाही. तरीही कोळपे यांनी भूविकास बँकेच्या थकबाकीची माहिती लपवून शिक्षक बँकेची निवडणूक लढविली. त्यांनी शासन, सहकार खात्याची फसवणूक केली असून, त्यांचे संचालकपद अपात्र ठरवावे, अशी तक्रार समितीचे सरचिटणीस सयाजी पाटील यांनी उपनिबंधकांकडे केली होती. या तक्रारीची चौकशी करून जिल्हा उपनिबंधकांनी कोळपे यांचे संचालकपद अपात्र ठरविले आहे. तसा आदेशही शिक्षक बँकेला दिला आहे. (प्रतिनिधी)
२००९ ते २०१४ या काळात बँकेचे अध्यक्ष व संचालक म्हणून कोळपे यांनी ज्या सवलतींचा लाभ घेतला, त्या सर्व बाबींची व्याजासह वसुली करावी. बँकेवर खोटेनाटे आरोप करणाऱ्या कोळपे यांची फसवेगिरी उघड झाली आहे, असा टोला सयाजी पाटील यांनी लगाविला.
अपील करणार : कोळपे
विश्वनाथ मिरजकर यांच्या संचालक मंडळाच्या गैरकारभाराविषयी उपनिबंधकांकडे अनेक तक्रारी केल्या. त्यामुळे शिक्षक बँक व उपनिबंधकांनी संगनमताने संचालकपद रद्द केले आहे. याविरोधात विभागीय उपनिबंधकांकडे अपील दाखल करणार असल्याचे कोळपे यांनी सांगितले.
सभासदच जागा दाखवतील : शिंदे
शिक्षक बँकेतील गैरकारभार संभाजी थोरात गटाने चव्हाट्यावर आणला आहे. मिरजकरांनी केलेला चुकीचा कारभार रद्द केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. कोळपे यांचे संचालकपद रद्द करण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. बँकेच्या आगामी निवडणुकीत सभासदच मिरजकर व त्यांच्या संचालकांना जागा दाखवतील, अशी प्रतिक्रिया संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांनी दिली.