कासेगाव येथे श्रमिक मुक्ती दलाचे ३३ वे अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:24 AM2021-01-22T04:24:17+5:302021-01-22T04:24:17+5:30
सांगली : श्रमिक मुक्ती दलाचे ३३ वे अधिवेशन शनिवारी व रविवारी (दि. २३ व २४ ) कासेगाव (ता. वाळवा) ...
सांगली : श्रमिक मुक्ती दलाचे ३३ वे अधिवेशन शनिवारी व रविवारी (दि. २३ व २४ ) कासेगाव (ता. वाळवा) येथे होणार आहे. क्रांतिवीर बाबूजी पाटणकर लोकशास्त्रीय संशोधन आणि प्रबोधन संस्थेत कार्यक्रम होतील.
अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर व कार्याध्यक्ष संपत देसाई यांनी सांगितले की, भांडवली अर्थव्यवस्था, जातीव्यवस्था, स्त्रियांचे शोषण संपविल्याविना पर्याय नाही. कोरोना महामारीच्या काळात ही बाब स्पष्टपणे समोर आली. शोषणमुक्त, समृद्ध, निरोगी समाजासाठी नव्याने चळवळीची गरज आहे. हे नवे जग शारीरिक आणि बौद्धिक कष्ट करणारी जनताच निर्माण करू शकते. यासंदर्भात अधिवेशनात मुख्य चर्चा होईल.
कोरोना महामारीने मानवी नातेसंबंधांवरही परिणाम केला आहे. त्यासाठी काय भूमिका घ्यावी आणि चळवळ कशी संघटित करावी याचाही विचार होईल. कोरोना व लॉकडाऊन काळात झालेल्या प्रमुख चळवळींचा तसेच नवीन उपक्रमांचा आढावा होईल. अधिवेशनासाठी दहा जिल्ह्यांतून प्रतिनिधी येणार आहेत. कोरोनामुळे प्रतिनिधींची संख्या मर्यादित केली आहे.
चौकट
महिलांना वारसाहक्क कायद्याची अंमलबजावणी
अन्यायी कृषी कायद्यांविरोधातील दिल्लीतील आंदोलनाच्या पाठिंब्यासाठीच्या चळवळींवर चर्चा होईल. वारसदार महिलेला मालमत्तेत समान वाट्यासाठी श्रमुदच्या आंदोलनाने शासनाने कायदा केला, त्याची अंमलबजावणी पूर्वप्रभावाने होण्यासाठी व्यापक चळवळीचे नियोजन होईल. लॉकडाऊननंतर नव्याने संघटनात्मक मांडणी केली जाईल. संघटनांतर्गत अभ्यास, प्रबोधनाची आखणीही होईल.
------