जिल्ह्यातील ३.५ टक्के नागरिक कोरोनाच्या पाशात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:26 AM2021-05-21T04:26:31+5:302021-05-21T04:26:31+5:30
सांगली : जिल्ह्यातील साडेतीन टक्के नागरिकांभोवती कोरोनाने पाश आवळला आहे. पहिल्यापेक्षा दुसऱ्या लाटेने जोरदार आक्रमण केले असून, प्रशासनाच्या आवाक्याबाहेर ...
सांगली : जिल्ह्यातील साडेतीन टक्के नागरिकांभोवती कोरोनाने पाश आवळला आहे. पहिल्यापेक्षा दुसऱ्या लाटेने जोरदार आक्रमण केले असून, प्रशासनाच्या आवाक्याबाहेर गेली आहे. व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन बेड या बाबतीत दुसऱ्या लाटेतच गंभीर स्थिती आहे.
गेल्यावर्षी २२ मार्चला पहिला रुग्ण सापडल्यापासून डिसेंबरपर्यंत लाट टिकली. नऊ महिन्यांत ४७ हजार ६१२ नागरिकांना कोरोनाने ग्रासले; पण दुसऱ्या लाटेत म्हणजे १ जानेवारीपासून १९ मेअखेर पावणेपाच महिन्यांत ५६ हजार ५९५ रुग्ण सापडले आहेत. पहिल्या लाटेची सरासरी प्रत्येक महिन्याला ५,२९० रुग्ण इतकी होती. पण, दुसऱ्या लाटेत महिन्याकाठी ११,३१९ रुग्ण सापडले आहेत. विशेष म्हणजे एप्रिल व मे महिन्यांत सर्वाधिक वाढ आहे. यातील ४५ हजारांहून अधिक रुग्ण या दोन महिन्यांतच सापडले आहेत. ३१ डिसेंबरअखेर १,७३३ जणांनी प्राण गमाविले, तर १ जानेवारी ते १९ मे या कालावधीत १३१३ रुग्ण मृत झाले.
पहिली लाट ऑगस्ट २०२० पासून वेगाने फैलावली. डिसेंबरपर्यंतच्या चार महिन्यांत १,७३३ जण मरण पावले. दुसऱ्या लाटेत एप्रिल आणि मे या पावणेदोन महिन्यांतच १,३१३ जणांचे बळी गेले आहेत. यावरून लाटेची तीव्रता ध्यानी येते. जिल्ह्याची लोकसंख्या ३० लाख आहे. याचा विचार करता साडेतीन टक्के लोक आजअखेर कोरोनाबाधित झाले आहेत.
चौकट
८४ टक्के रुग्ण बरे झाले
जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ४ हजार २०७ आहे. त्यापैकी ८७ हजार २८७ जणांनी कोरोनावर मात केली. म्हणजे ८४ टक्के रुग्ण बरे झाले, ही बाब दिलासा देणारी आहे. मृतांपैकी बहुतांश रुग्ण मधुमेह, रक्तदाब व अन्य विकारांनी ग्रस्त होते, त्यामुळेही मृत्यूचे प्रमाण वाढले.
चौकट
दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागाला ग्रासले
पहिल्या लाटेत ३१ डिसेंपर्यंत २४ हजार ८४ रुग्ण ग्रामीण भागातील होते. दुसऱ्या लाटेत ही संख्या ३९ हजारांवर गेली. यावरून ग्रामीण भागात कोरोनाचा अधिक वेगाने पसरल्याचे जाणवते. गतवर्षी महापालिका क्षेत्रात १६ हजार ४५९ रुग्ण सापडले, दुसऱ्या लाटेत हीच संख्या ९ हजार ७२४ इतकी आहे. यामुळे दाट वस्तीच्या शहरी भागात तुलनेने कमी फैलाव झाल्याचे स्पष्ट होते.