विद्युत खांब स्थलांतर खर्चात ३५ लाखांची तफावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:26 AM2021-03-05T04:26:14+5:302021-03-05T04:26:14+5:30
सांगली : कुपवाड ते वसंतदादा सूतगिरणीपर्यंतच्या रस्त्यावरील विद्युत खांब स्थलांतर करण्याची मागणी प्रलंबित आहे. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी ...
सांगली : कुपवाड ते वसंतदादा सूतगिरणीपर्यंतच्या रस्त्यावरील विद्युत खांब स्थलांतर करण्याची मागणी प्रलंबित आहे. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी या रस्त्याची पाहणी केली. यावेळी विद्युत खांब स्थलांतर कामाच्या अंदाजपत्रकात ३५ लाख रुपयांची तफावत असल्याचे आढळून आले.
महापालिकेने या कामासाठी ८० लाखांचे अंदाजपत्रक तयार केले आहे, तर महावितरणकडून ४५ लाख रुपये खर्चाचे अंदाजपत्रक सादर झाले आहे. त्यामुळे महापौरांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
कुपवाड संघर्ष समितीच्या वतीने वसंतदादा सूतगिरणी ते कुपवाड या रस्त्यावरील विद्युत खांब हटवून ते रस्त्यांच्या कडेला घ्यावेत, पूर्ण लांबीने रस्ता करावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. याबाबत महापौर सूर्यवंशी यांनी कुपवाड कार्यालयात बैठक घेतली. या कामासाठी महावितरणचे अंदाजपत्रक ४५ लाखांचे, तर महापालिकेचे ८० लाखांचे आहे. अंदाजपत्रकातच ३५ लाखाची तफावत त्यांच्या निदर्शनास आली. अंदाजपत्रकीय किमतीत जवळपास दुप्पट तफावत आहे. ‘एवढी तफावत असेल तर हे काम महावितरणकडूनच करून घेतलेले बरे’, असे उद्गार सूर्यवंशी यांनी काढले. दरम्यान, या कामाच्या खर्चावरून निर्माण झालेल्या प्रश्नावरून महापालिका व महावितरण अधिकार्यांची संयुक्त बैठक बोलवून तोडगा काढण्याचा निर्णय महापौरांनी घेतला.
यावेळी कुपवाड पाण्याच्या टाकीपासून पुढे ६०० मीटर रस्ता कामाचे अंदाजपत्रक सादर करण्याची सूचना महापौरांनी अधिकार्यांना दिली. कुपवाड एमआयडीसी येथे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे वाहन आहे. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने हे वाहन सायंकाळी मिरजेला हलवले जाते. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून हे वाहन कुपवाड येथे कायमस्वरूपी राहील. त्यासंदर्भात कार्यवाही होईल, असे सूर्यवंशी यांनी सांगितले. यावेळी महापौरांनी कुपवाड येथील महापालिकेच्या जुन्या कार्यालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या व्यवस्थेची पाहणीही केली.