कडेगाव तालुक्यातील ३५ गावे सिटी सर्व्हेविना : नागरिकांना करावा लागतोय अडचणींचा सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 11:08 PM2018-05-07T23:08:57+5:302018-05-07T23:08:57+5:30
देवराष्ट्रे : स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी अनेक गावांतील गावठाण हद्दीचे नकाशे तयार केले, तेच नकाशे आजही आहेत; पण त्याच नकाशावरून गावातील वैयक्तिक हद्दी कायम करून त्यांची नोंद शासकीय दप्तरी होणे
अतुल जाधव ।
देवराष्ट्रे : स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी अनेक गावांतील गावठाण हद्दीचे नकाशे तयार केले, तेच नकाशे आजही आहेत; पण त्याच नकाशावरून गावातील वैयक्तिक हद्दी कायम करून त्यांची नोंद शासकीय दप्तरी होणे गरजेचे असताना, शासनाच्या दिरंगाईने गेल्या ७० वर्षांत या नोंदी शासनाने न केल्यामुळे गावठाणमधील हद्दी वादावादीचे विषय ठरत आहेत. कडेगाव तालुक्यातील ३५ गावांचा गेल्या ७० वर्षांत सिटी सर्व्हे झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कडेगाव तालुका निर्माण होऊन १५ वर्षे झाली; पण अजून राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे व अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे तालुक्यातील विविध विषय बाजूला पडले आहेत. सिटी सर्व्हे होणे हा ग्रामीण भागातील अत्यंत गरजेचा विषय असतानाही, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. तालुक्यात ३५ गावांतील जवळजवळ हजारो घरे व खुल्या जागांची शासनदरबारी नोंद नाही. या गावठाणमधील जागेचे नकाशेही शासनाने तयार केलेले नाहीत. त्यामुळे गावात कोणाची कोणती जागा आहे, यावरून गावा-गावात भांडणे व वादविवाद चालू असतात. ग्रामीण भागातील सर्वात जास्त तक्रारी या जागेवरून चालू असतात. या जागेचा सिटी सर्व्हे झाल्यास बरेच वाद कोर्टात न जाता मिटतील.
सत्तरच्या दशकात तालुक्यातील ५५ गावांपैकी फक्त १९ गावांचा सिटी सर्व्हे झाला. यामध्ये कडेगाव, कडेपूर, शाळगाव, विहापूर, अमरापूर, वडियेरायबाग, हिंगणगाव (बु), तोंडोली, येतगाव, नेवरी, शिवणी, देवराष्ट्रे, चिंचणी, मोहिते वडगाव, अंबक, रामापूर, वांगी, तडसर, हिंगणगाव खुर्द, तर उर्वरित ३५ गावे अजूनही सिटी सर्व्हेपासून वंचित आहेत. उर्वरित गावांचा सिटी सर्व्हे करण्यास शासनाने अद्याप हालचाल केलेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
सर्व्हे नाही, कर्ज नाही
गावातील गावठाण जागेचा सिटी सर्व्हे झालेला नाही, नकाशा नाही, अशा कोणत्याही मालमत्तेवर बँक कर्ज देत नाही. सिटी सर्व्हे न झालेल्या जागेवर कर्ज मिळाले तर त्याचा बोजा संबंधित जागेवर चढविण्यास शासनाने ग्रामपंचायतींना मज्जाव केला आहे.
उतारे फक्त करासाठी!
गावठाणमधील मालमत्तेवर बँकांकडून कर्ज घेतल्यास त्याचा बोजा सिटी सर्व्हे उताºयावर चढविणे बंधनकारक आहे. याची नोंद ग्रामपंचायतीमध्ये करणे ग्राह्य नाही. ग्रामपंचायत उतारे हे कर गोळा करण्यासाठीचे आहेत, असा आदेश शासनाने काढल्यामुळे नागरिकांची कोंडी झाली आहे.