जिल्ह्यात ३५0 कोटींचे बॅँक व्यवहार झाले ठप्प
By admin | Published: February 28, 2017 11:44 PM2017-02-28T23:44:52+5:302017-02-28T23:44:52+5:30
कर्मचाऱ्यांचा संप : शासन धोरणांविरोधात सांगलीत निदर्शने
सांगली : प्रस्तावित कामगार कायद्यातील बदलासह अन्य शासकीय धोरणांचा निषेध करीत, सांगली जिल्हा बँक कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने मंगळवारी पटेल चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. या देशव्यापी संपात कर्मचारी सहभागी झाल्यामुळे जिल्ह्यातील ३५0 कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले.
सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचा देशव्यापी लाक्षणिक संप युनाइटेड फोरम आॅफ बँक युनियन्स या शिखर संघटनेने पुकारला होता. त्यात सांगलीतील बँक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रस्तावित कामगार कायद्यातील बदलास आमचा विरोध आहे. बँकांमधील असलेले बाह्यस्रोत (आऊटसोर्सिंग) बंद करावेत, बँकांमधील शासनाचा हिस्सा कमी करून खासगीकरणाकडे सुरू असलेली वाटचाल थांबवावी, नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, एनपीए वसुलीसाठी योग्य कायदे करावेत, जाणीवपूर्वक बँकांची कर्जे बुडविणाऱ्या धनदांडग्या व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत, पाच दिवसांचा आठवडा करावा आदी मागण्या यामध्ये करण्यात आल्या आहेत.
शासनाच्या धोरणांविरोधात यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात समन्वय समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कट्टी, अनंत मराठे, अरविंद चौगुले, दीपक चव्हाण, अनंत बिळगी, संजय देशपांडे, उल्का तामगावकर, प्रताप पाटील, परशुराम भोई आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
२७0 शाखा जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या मंगळवारी
पूर्णपणे बंद राहिल्या.
अंदाजे ३५0
कोटींची आर्थिक उलाढाल
जिल्ह्यातील या आंदोलनामुळे ठप्प झाली. नागरिकांची यामुळे मोठी गैरसोय झाली.
यापूर्वी तीन दिवस बॅँका बंद होत्या. सोमवारी एक दिवस बॅँक सुरू होऊन पुन्हा लाक्षणिक संप झाल्यामुळे चेक क्लिअरिंगसहीत अन्य व्यवहारांवर परिणाम झाला आहे. संपामुळे आता बुधवारी बॅँकांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होण्याची चिन्हे दिसत आहेत.