सांगलीसह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्याकडून ३६ लाखांचा ऐवज जप्त, एलसीबीची कारवाई
By शरद जाधव | Published: March 17, 2023 06:00 PM2023-03-17T18:00:06+5:302023-03-17T18:00:37+5:30
एकटाच ठरला सर्वांना भारी
सांगली : जिल्ह्यासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यामध्ये १६ ठिकाणी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी जेरबंद केले. रमेश रामलिंग तांबारे (वय ४६, दत्तनगर, पलूस) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून पिस्तुलासह दोन किलो चांदी आणि ६४ तोळे सोने असा तब्बल ३६ लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली.
जिल्ह्यासह शहरात चोरी, घरफोडीचे प्रकार वाढले आहेत. या गुन्ह्यांच्या तपासासाठी एलसीबीने खास पथक तयार केले आहे. हे पथक सांगली शहरात गस्तीवर असताना, त्यांना माहिती मिळाली की, घरफोडी करणारा संशयित चोरीचे सोने विक्री करण्यासाठी माधवनगर रस्त्यावरील बायपास परिसरात येणार आहे. त्यानुसार पथकाने तिथे जात सापळा लावून संशयिताला ताब्यात घेतले.
त्याच्या झडतीत पँटच्या खिशात सोन्याचे दागिने तसेच दुचाकीच्या डिक्कीत १६ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, एक किलो ३५५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दगिने, चांदीची भांडी आणि एक पिस्तूल आढळले. चौकशीत त्याने वडगाव (जि. कोल्हापूर), कर्नाळ (ता.मिरज), येडेनिपाणी (ता.वाळवा व सोनी (ता.मिरज) येथे चोरी केल्याची कबुली दिली. तर दोन वर्षांपूर्वी शिरगाव (ता. तासगाव) येथून चोरल्याची कबुली दिली. अधिक चौकशीत त्याने सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील २६ घरफोड्यांची कबुली दिली.
वरिष्ठ पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक संदीप शिंदे, संदीप गुरव, सागर लवटे, विक्रम खोत, बिरोबा नरळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
एकटाच ठरला सर्वांना भारी
प्रथमच रेकाॅर्डवर संशयित रमेश तांबारे हा एकटाच सर्वठिकाणी चोरी करत असल्याचे समोर आला आहे. सर्वठिकाणी चोरी करण्याचीही त्याची पध्दत सारखीच आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद होऊ नये यासाठी तो मास्कच्या साहाय्याने आपला चेहरा झाकत असे. तर हातमोजे, जर्किन घातल्याने पोलिसांना सहज लक्षात येत नव्हते. विशेष म्हणजे तो मोबाइल वापरत नसल्याने त्याला पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.
मेडिकल, रुग्णालयेच लक्ष्य
तांबारे याने केलेल्या घरफोड्यातील बहुतांश ठिकाणी मेडिकल दुकाने व रुग्णालयातच त्याने डल्ला मारला आहे. या ठिकाणी किमती ऐवज त्याच्या हाती लागत होता. चोरी केलेला माल तो शेतात ठेवत असे.