सांगलीत भरदिवसा घर फोडून ३७ तोळे दागिने लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 03:25 PM2023-01-11T15:25:05+5:302023-01-11T15:25:33+5:30
एकूण आठ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला
सांगली : शहरातील गजबजलेल्या टिळक चौकातील घर फोडून चोरट्यांनी तब्बल ३७ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. रोख १० हजारांसह दागिने असा एकूण आठ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. या प्रकरणी सर्वेश मुरलीधर बियाणी (रा. पेठभाग, सांगली) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मंगळवारी दुपारी दोन ते सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील नामवंत कापड व्यापारी म्हणून बियाणी यांची ओळख आहे. टिळक चौकानजीक पेठभाग परिसरात बियाणी बिल्डिंगमध्ये ते राहण्यास आहेत. मंगळवारी दुपारी बियाणी कुटुंबीय कामाच्या निमित्ताने घर बंद करून इचलकरंजी येथे गेले होते. नेमकी हीच संधी साधून चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व आतील लोखंडी कपाटात ठेवलेले दागिने लंपास केले. परतल्यानंतर चोरीचा प्रकार बियाणी यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
हे दागिने पळवले...
बियाणी यांच्या घरातून १ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे नेकलेस, ९० ग्रॅमचे कानातील तीन टॉप्सचे सेट, ७० हजारांची २० ग्रॅम सोन्याची चेन, ७० हजारांचा ३५ ग्रॅम सोन्याचा कपाळावरील बोर, १ लाख २० हजारांच्या ६० ग्रॅम चार सोन्याच्या बांगड्या, ७० हजारांचे ३५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, ६० हजारांच्या ५ ग्रॅम सहा सोन्याच्या अंगठ्या, ४० हजारांचे १० ग्रॅमचे दोन वेढण, ५० हजारांची २५ ग्रॅम सोन्याची चेन, ३० हजारांची दोन सोन्याची नाणी, २० हजारांचा दहा ग्रॅम सोन्याचा डाळा, १ लाख १२ हजार ५०० रुपयांचा डायमंड नेकलेस व ४५ ग्रॅम वजनाचा टॉप्स सेट, १० हजार रुपयांची चांदी चोरट्यांनी लंपास केली.